नवी मुंबई : या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असून यासाठी बाजारपेठांत खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. नवी मुंबई पोलिसांनी सोसायटी व सार्वजनिक गणेशात्सवासाठी ३०० मंडळांना परवानगी दिली आहे. दुसरीकडे चोख पोलीस बंदोबस्ताचेही नियोजन केले आहे. महापालिका प्रशासनाने विसर्जनासठीची तयारी केली असून पारंपरिक २२ विसर्जन स्थळांव्यतिरिक्त विविध विभागांमध्ये १३४ कृत्रिम विसर्जन तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, रविवारी सार्वजनिक मंडळांच्या अनेक गणेशमूर्तीचे मोठय़ा उत्साहात आगमन झाले. गणेशमूर्ती आपल्या विभागात आल्यानंतर ढोल ताशा, डीजे लावून वाजतगाजत स्वागत करण्यात आले.

करोनामुळे दोन वर्षे अतिशय साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्यात आला होता. यात गणेशमूर्तीच्या उंचीवरही मर्यादा होत्या. आता निर्बंधमुक्त उत्सवाला शासनाने परवानगी दिल्यानंतर गणेशभक्तांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे. बुधवारी गणरायाचे आगमन होणार असल्याने शहरातील बााजारपेठांमध्ये खरेदीसाठीची झुंबड पाहायला मिळत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सजावटीचे कामही अंतिम टप्प्यात आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने गणेशोत्सवासाठी मंडप उभारण्याकरिता परवानगी मिळण्यासाठी अर्ज करण्यास १४ जुलैपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार शहरात १६४ मंडळांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. तर सोसायटय़ांमधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मिळून शहरात ३०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे यंदाचा उत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली.

एकीकडे आगमनाची तयारी सुरू असताना विसर्जनाची तयारीही पालिका प्रशासन व पोलिसांनी केली आहे.

फळे महाग, फुले स्वस्त

गणेशोत्सव काळात फुले व फळांना मागणी असते. सोमवारी एपीएमसीतील फळ बाजारात फळांची आवक दुपटीने वाढली आहे. असे असले तरी फळांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. तर मॅफको बाजारात फुल विक्रेत्यानी दुकाने थाटली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत दर कमी आहेत. झेंडू १२० तर शेवंती २०० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध आहे.

फळांच्या दरात  १० ते १५ टक्के वाढ

एपीएमसीतील फळ बाजारात सोमवारी ६०० गाडय़ांची आवक झाली. नियमित ३०० ते ३५० गाडी आवक होत असते. दुप्पट आवक होऊनही मागणी अधिक असल्याने फळांच्या दरात १० ते १५ टक्के वाढ झाली आहे. डाळिंबाच्या २० ते २५, सीताफळ १५ ते २० , सफरचंद ४० ,मोसंबी १५ ते २० गाडय़ांची आवक होत असल्याची  माहिती फळ व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली.

फळांचे घाऊक दर

फळ         आता             आधी

डाळींब       ८० ते २५०     ५० ते १६० 

सीताफळ     ३० ते १५०    ३० ते १२०

मोसंबी       ४० ते ७०     ३० ते ६०

विभागवार कृत्रिम तलाव

बेलापूर विभाग- २८

नेरुळ विभाग- २१

वाशी विभाग- १७

तुर्भे विभाग- १७

कोपरखैरणे विभाग- ३९

घणसोली विभाग-९

ऐरोली विभाग- २४

दिघा विभाग- ९

नवी मुंबई शहरात गणेशोत्सवासाठी महापालिकेने योग्य तयारी केली असून विसर्जनासाठी कृत्रिम तलावांचा जास्तीत जास्त वापर करावा. आरोग्याची योग्य ती काळजी घेऊन गणेशोत्सव साजरा करावा. सर्व तलावांवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. दीड दिवसांच्या गणरायाच्या विसर्जनापूर्वीच सर्व कृत्रिम तलाव सज्ज ठेवण्यात येणार आहेत. 

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

शहरात भक्तीमय वातावरण असून पोलीस आयुक्तालय परिमंडळ १ मध्ये ३०० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. शांततेत व उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यासाठी योग्य त्या सुरक्षा व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. 

– विवेक पानसरे,  पोलीस उपायुक्त परिमंडळ १