मुंब्रा येथून चारचाकीमध्ये घणसोली येथे गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाचा साठा घेऊन येणाऱ्या त्रिकुटाला कोपरखरणे पोलिसांनी सापळा लावून अटक केली. कारसह गुटखा तसेच तंबाखूजन्य पदार्थाचे सुमारे दहा लाख रुपये किमतीचा माल हस्तगत केला.
घणसोलीतील सावली गाव येथील दग्र्याजवळ गुटख्याचा साठा घेऊन काही व्यक्ती येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम बोनसोडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापाळा रचला. यावेळी घणसोली येथील दग्र्याजवळ आलेल्या इर्टिगा कारमधील व्यक्तीच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी ती कार अडवून तपासणी केली. त्यावेळी कारच्या डिकीमध्ये गोवा गुटख्याच्या ७ गोण्या, गोवा पान, मसाल्याच्या ९ गोण्या आढळून आल्या. पोलिसांनी कारसह गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थाचा असा सुमारे पावणे दहा लाख रुपये किमतीचा माल जप्त केला. पोलिसांनी रामू इंद्रसेन पाल, दिनेश आईवले, अमोल आंबेकर या आरोपींना अटक केली. या आरोपीवर अन्न भेसळ अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांची अधिक चौकशी करण्यात आली असता त्यांनी सदर गुटख्याचा साठा मुंब्रा येथून आणल्याचे कबुली दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Story img Loader