पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या वावंजे येथील उस्मान चाळीच्या मागील बाजूस प्लास्टिक दाणा गोदामातील गुटखा कारखान्यावर कारवाई करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली असून १० लाख ९६ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त केला आहे.
पनवेल तालुक्यातील वावंजे येथे गुटखा बनत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. यानुसार गुरुवारी गोदामावर छाटा टाकण्यात आला. गोदामात ८ लाख ९८ हजार रुपये किमतीच्या १२ गोणी सापडल्या असून यात गुटखा होता. तसेच ३८ हजार ४०० रुपयांचे गुटखा पॅकिंगचे एकूण १५ प्लास्टिकचे रोल व १ लाख ६० हजार रुपये किमतीचे २ गुटखा पॅकिंग मशीन असा एकूण १० लाख ९६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी बालाजी शिंदे यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कारखाना मालक जमील अहमद आनीकूर रेहमान सिद्दीकी (४७) खारघर येथे राहणारा असून त्याला अटक करण्यात आली आहे. तर अद्यापही दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त अशोक दुधे व सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप माने यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि अशोक राजपूत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
तालुक्यात मोठी गुटखा कारवाई झाली असल्याने गुटखा माफियांचे धाबे दणाणले असून पनवेल तालुक्यामध्ये सर्रास भेसळयुक्त गुटखा विकला जात आहे हा दावा फोल ठरत नसल्याचे यावरून दिसून येते.