पनवेल : राज्यात गुटखा प्रतिबंधित असला तरी पनवेल व परिसरात पानाच्या गादी आणि टप-यांवर गुटखाविक्री सूरु आहे. नवी मुंबई पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती कक्षाने पनवेलमध्ये पाळत ठेऊन गुटखा पुरवठा कऱणा-या टेम्पो चालकाला शहरातील बंदररोड येथील वाली गृहनिर्माण संस्थेसमोर २० लाख रुपयांच्या मुद्देमालासह रात्री साडे दहा वाजता पकडले. या कारवाईमुळे गुटखा विक्रीला आश्रय देणा-यांचे धाबे दणाणले आहेत.
पनवेल शहरासह सिडको वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात पान टप-यांवर गुटखा विक्री चढ्या दराने होते. यापूर्वी पनवेलमध्ये अन्न औषधे व प्रशासन या विभागाने तसेच पोलीस विभागाने अनेकदा लहान व्यापा-यांवर कारवाई केली. मात्र या टपरी चालकांना गुटखा कोण पुरवितो त्याचा शोध अजूनही कोणतीही यंत्रणा लावू शकली नाही. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी मुळ पुरवठादाराचा शोध घेण्याचे आदेश सहाय्यक पोलीस आयुक्त विनायक वस्त यांना दिले होते.
यामुळे पनवेलमध्ये गुटख्याचा मोठा पुरवठादार व्यवसाय करतोय, अशी बातमी मिळाल्यानंतर पोलीसांनी या गुटखा घेऊन आलेल्या टाटा टेम्पोतून १४ लाख ४२ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. आजपर्यंतची गुटखा जप्तीची ही सर्वात मोठी कारवाई आहे. चालकाला ताब्यात घेतल्यावर पनवेल व नवी मुंबईत गुटखा विक्रीचा मुख्य सूत्रधार कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. या कारवाई नंतर तरी पनवेलमध्ये गुटखा विक्री बंद होते का, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.