कोकणातून हापूस आंब्याची आवक मुंबईच्या घाऊक बाजारपेठेत सुरू झाली असून दर दिवशी तुर्भे येथील एपीएमसी फळ बाजारात २० ते २५ पेटय़ा येणे सुरू आहे. मात्र सोमवारी सर्वाधिक साडेचारशे पेटय़ा हापूस आंबा दाखल झाला आहे. हापूस आंब्याच्या इतिहासात ही सर्वाधिक आवक अशी नोंद झाली आहे. सर्वसाधारणपणे एप्रिलच्या अखेर हापूस आंब्याची घाऊक बाजारात आवक वाढत असल्याचे दिसून येते, मात्र जानेवारी महिन्यातील या सर्वाधिक आवकमुळे व्यापारी आश्चर्यचकित झाले आहेत. कोकणातील आंबा बागायतदार आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान आत्मसात करून हे उत्पादन वाढवत असल्याचे सांगितले जात आहे. कोकणातील रत्नागिरी, देवगड, वेंगुर्ला, मालवण, अलिबाग येथील हापूस आंब्याची तुर्भे येथील घाऊक बाजारात आवक टप्प्याटप्प्याने वाढू लागली आहे. डिसेंबर महिन्यात मुंबई-पुण्यातील काही किरकोळ हापूस आंब्याच्या पेटय़ा वगळता जानेवारीपासून घाऊक बाजारात हापूस आंब्याची नियमित आवक सुरू झाली आहे. सध्या सरासरी वीस ते पंचवीस पेटय़ा हापूस आंबा बाजारात येत असताना सोमवारी अचानक साडेचारशे हापूस आंब्याच्या पेटय़ा बाजारात आल्या होत्या. सर्वसाधारणपणे गुढीपाडव्यानंतर हापूस आंब्याची आवक वाढत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले, मात्र जानेवारीच्या अखेर बाजारात इतक्या मोठय़ा प्रमाणात हापूस आंबा बघून व्यापाऱ्यांनीही तोंडात बोटे घातलेली आहेत. कोकणातील हापूस आंबा बागायतदार या जीवघेण्या स्पर्धेला तोंड देण्यास सज्ज झाला आहे. सर्जनशील उत्पादनाचे हे उदाहरण असल्याचे व्यापारी संजय पानसरे यांनी सांगितले. हापूस आंब्याला सर्वाधिक आवश्यक असलेला कडक उन्हाळा सध्या नसल्याने बाजारात आलेला हा हापूस आंबा खाण्यास सर्वोत्तम नाही. कृत्रिमरीत्या तो पिकवला जात असल्याने त्यातील काही भाग खराब निघण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे कोकणातील बागायतदारांनी संख्येबरोबरच आता गुणवत्तेचीपण काळजी घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. फळबाजारात सध्या संत्री, मोसंबी, सफरचंद यांसारख्या इतर फळांच्या २२५ गाडय़ा भरून फळे आलेली आहेत. हापूस आंब्याचा हंगाम यंदा लवकर सुरू झाला असून तो लवकर संपणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत.