विकास महाडिक
१४ जणांना करोना विषाणूची लागण झाल्याने भाजीची वाहतूक करणारी निम्मीच वाहने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घाऊक भाजी बाजारात शुक्रवारी दाखल झाली. गुरुवारी बाजारात भाजीची १६९ वाहने आली होती, तर शुक्रवारी ९५ वाहनेभाजी बाजारात आणली गेली. याच वेळी शनिवारपासून भाजी बाजारातील व्यापाऱ्यांनी तुरळक भाजीची मागणी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने बाजारात ‘बंद’चे स्वरूप असेल, असे चित्र आहे.
देशभरात जाहीर केलेल्या टाळेबंदीची मुदत सोमवार, ४ मे रोजी संपुष्टात येत आहे. मात्र, करोनाबाधितांचा आकडा अधिक असल्याने मुंबई महानगर क्षेत्रात टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. बाजारात सध्या व्यापारी, काही माथाडी, मापाडी, वाहतूकदार आणि सर्वाधिक खरेदीदार अशी गर्दी होत आहे. गुरुवारी दिवसभरात पाच ते सहा हजार घटकांची रेलचेल होती. मात्र, व्यापाऱ्यांनी गुरुवारी शेतमालाची कमी मागणी नोंदविल्याने भाजीची १६९ वाहने एपीएमसी आली होती. शुक्रवारी ही संख्या निम्म्यावर आली होती. शनिवारी ही संख्या याहून कमी होणार आहे. त्यामुळे एपीएमसीत अघोषित बंद असेल.
ल्ल गर्दी केवळ नफेखोरीसाठीच
भाजी बाजारात खरेदीदारांची गर्दी होत आहे. ही खरेदी नागरिकांच्या सेवेसाठी नसून नफा कमावण्यासाठी आहे, असा आरोप काही व्यापाऱ्यांनी केला आहे. एखाददुसरा खरेदीदार पोलिसांच्या भीतीने काही काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना करतो. मात्र, पोलिसांची पाठ फिरताच टाळेबंदीचे सारे नियम धाब्यावर बसवले जातात. त्यामुळे व्यापारी वर्ग चिंतित आहे.
* भय.. नोटिसांचे आणि संक्रमणाचेही
घाऊक बाजारात करोना रुग्णांची संख्या २०च्या घरात गेली आहे. त्यांच्या संपर्कात किती जण आले होते, याची तपासणी सुरू आहे. बाजार बंद करण्याचा सामूहिक निर्णय घेतल्यास समिती कारवाईची नोटीस बजावत आहे आणि बाजार सुरू ठेवल्यास करोनाचे भय आहे. अशा स्थितीत व्यापाऱ्यांनी शेतमालाची मागणी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे कळते.