रायगड जिल्ह्य़ासाठीची सैन्यभरती पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट अकादमीत ४ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून यासाठी ५० हजार तरुणांनी नोंदणी केली आहे. दररोज ५ हजार उमेदवारांची भरती प्रक्रियेसाठीच्या विविध परीक्षा घेतल्या जात आहेत. १३ ऑक्टोबपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहाणार आहे. मोठय़ा प्रमाणावर तरुण या भरतीत सहभागी होण्यासाठी पनवेल येथे दररोज दाखल होत असून पोलीस प्रशासनासह ग्रामस्थ व समाजसेवकांनी त्यांना निवारा व अन्न देण्यासाठी मदतीचा हात दिला आहे.

६ ऑक्टोबरला नाशिक येथील तरुणांची भरती प्रकिया होणार आहे. येथून मोठय़ा प्रमाणात उमेदवार सहभागी झाल्याचे सांगण्यात आले. सरकारी नोकरी व इतर ठिकाणी नोकरीची संधी नसल्याने सैन्यभरतीसाठी आल्याचे काही उमेदवारांनी सांगितले.

भरतीत कोणताही गैरप्रकार होणार नाही, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे आवाहन लोकसत्ताशी बोलताना भरती अधिकारी सतीश वासाडे यांनी केले. युवकांची राहण्याची सोय कर्नाळा स्पोर्टमध्ये करण्यात आली असून झोपण्यासाठी मंडप उभारण्यात आले आहेत.

सैनिक भरती प्राधिकरण मुंबई यांच्यामार्फत सैनिक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. प्रथम धावण्याची चाचणी घेतली जात असून त्यानंतर आरोग्य व शारीरिक चाचणी घेतली जाते. त्यानंतर लेखी परीक्षा होते. त्यातून निवड झालेल्यांचीच फक्त जेवणाची सोय करण्यात येत आहे.

देशाच्या भावी सैनिकांची गैरसोय होऊ नये म्हणून खांदावासीयांनी हात पुढे केले आहे. ग्रामस्थांनी जेवणाची व्यवस्था केली आहे. ठाणा नाका येथे धीरूभाई लिंबानी हे गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यासाठी पहाटे चहा आणि बिस्कीटचा व्यवस्था करीत आहेत. त्याचबरोबर रात्री व्हेज पुलाव बनवून या उमेदवारांना देत आहेत. पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

नाशिक येथून आलेल्या दत्तात्रेय मढे, गणेश खताळ, रवींद्र गोखरवरे, अश्विन वरे या तरुणांशी संवाद साधला असता, नोकरभरती होत नाही. शिवाय देशासाठी काहीतरी करायची संधी मिळतेय म्हणून आम्ही सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले.