दोन डझन हापूस आंबे सहा हजार रुपयांत विकल्याची चर्चा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वसाधारणपणे नवीन वर्षांच्या सुरुवातीस मुंबईच्या किरकोळ बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होणारा कोकणचा हापूस आंबा यंदा एक महिना आधीच मुंबईत दाखल झाला आहे. देवगड तालुक्यातील (रत्नागिरी) कुणकेश्वरचे प्रगतशील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांनी दोन डझन हापसू आंब्यांची पेटी बुधवारी तुर्भे येथील घाऊक फळ बाजारात आनंद केशवराव शेजवळ यांच्याकडे विक्रीसाठी पाठविली. ती क्रॉफर्ड मार्केटमधील श्याम भिरुमल यांनी खरेदी केली. या आंब्यांची किंमत जाहीर करण्यात आली नसली तरी दोन डझनाच्या या पेटीला सहा ते सात हजार रुपये मिळाल्याची चर्चा आहे.

कोकणातील हापूस आंब्याचे यंदा चांगले उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सर्वसाधारणपणे मोहर हिवाळ्यात येत असे. फळधारणा अलीकडे विविध प्रकारच्या आधुनिक तंत्रांनी केली जाऊ लागल्यामुळे मोहर लवकर होऊ लागला आहे. त्यामुळे गुढीपाडव्यानंतर  हापूस आंबा बाजारात पाठविण्याचा काळ मागे पडला आहे. लवकरात लवकर हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध करण्याची अहमिका बागायतदारांमध्ये वाढली आहे. या स्पर्धेत नेहमीच आघाडीवर असणारे देवगड मधील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांनी बुधवारी दोन डझनाचा हापूस आंबा व चार डझन केसर आणि दीड डझन पायरी आंबे विक्रीसाठी आनंद केशवराव शेजवळ या एपीएमसीतील घाऊक व्यापाऱ्याकडे पाठविले. मोसमात येणारा पहिला हापूस आंबा खरेदी करणे प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यामुळे हापूस आंब्याची मोसमातील ही पहिली पेटी लगेच विकली गेली. हा हापूस आंबा काही दिवसांनी खाण्यालायक होणार आहे.

यंदा हापूस आंब्याचे उत्पादन चांगले येणार असल्याचे हे संकेत असल्याने व्यापारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

कोकणातील प्रगतीशील व्यापारी अरिवद वाळके यांच्या बागेतील हा मोसमातील पहिला हापूस आंबा आहे. तो आमच्या पेढीवर आला. फळांच्या या राजाचे आम्ही विधिवत पूजन केले आणि त्यानंतरच त्याची विक्री करण्यात आली आहे. त्याचबरोबर केसर, पायरी आंब्याचेही बाजारात स्वागत झाले आहे.

आनंद शेजवळ, फळ व्यापारी, एपीएमसी, तुर्भे

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hapus mango in navi mumbai market