नवी मुंबई : घरगुती हिंसाचार प्रकरणी तीन नणंद, सासू सासरे आणि पती विरोधात एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रेम विवाह होऊनही लग्न झाल्यावर काही दिवसातच शारीरिक मानसिक त्रास देणे सुरु झाले त्यात काही दिवसांपूर्वी पीडितेला मुलगी झाली आणि ती काळी सावली झाली, आम्हाला मुलगाच हवा होता असं म्हणून अधिकचा त्रास देण्यात आला.
एका विवाहित महिलेस पती आणि अन्य नातेवाईक क्षुल्लक कारणावरून मानसिक त्रास देत होते. धक्कादायक बाब म्हणजे त्रासाबद्दल कोणाला सांगितले तर विवाहपूर्वीचे व्हिडीओ आणि फोटो प्रसार करण्याची धमकी खुद्द पतीचे देत होता. त्यामुळे हा जाच पीडित विवाहिता सहन करीत होती. या दरम्यान तिला मुलगी झाली. मात्र सासरच्या लोकांना मुलगा हवा होता. त्यावरूनही मुलगी झाली तीही काळीसावळी झाली म्हणून शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करणे टोमणे मारणे आदी शारीरिक आणि मानसिक त्रासात वाढ होत गेली.
आणखी वाचा-रेल्वेरुळाखाली आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे प्राण पोलीसांनी वाचवले
अखेर या पीडित विवाहित महिलेने पती सुदीप धोजू, सासू लक्ष्मी, सासरे, रमेश, शर्मिला, कमला, अरुणा या नणंद यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीवरून एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटना १२ जुलै २०१७ ते २८ जून २०२३ दरम्यान घडल्या आहेत. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसून तपास सुरु आहे. पतीचा शोध सुरु असून अन्य नातेवाईक नेपाळ देशात राहतात अशी माहिती समोर आली असून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे . अशी माहिती एनआरआय पोलिसांनी दिली.