दुसऱ्या फेरीतील नोंदणी अंतिम टप्प्यात

फेरीवाल्यांचे सर्वेक्षण मार्च अखेपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार नवी मुंबई महापालिकेने केला आहे. सर्वेक्षणाच्या पहिल्या फेरीत बेलापूर ते दिघा या परिसारातील तीन हजार ७२१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. फक्त तुर्भे, घणसेली व ऐरोलीतील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण बाकी आहे.

नवी मुंबई शहरात १० हजारांपेक्षा अधिक विनापरवाना फेरीवाले आहेत. पालिकाक्षेत्रात फक्त दोन हजार १३८ फेरीवाल्यांनाच परवाना देण्यात आला होता. पालिकेने फेरीवाला समितीच्या बैठकीनंतर शहरातील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू केले होते. सर्वेक्षणाची सुरुवात नोव्हेंबरमध्ये बेलापूर विभागापासून करण्यात आली होती. पहिल्या फेरीत बेलापूर ते दिघा भागातील तीन हजार ७२१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. फेब्रुवारीत सुरू झालेल्या दुसऱ्या फेरीचे सर्वेक्षणही अंतिम टप्प्यात आले असून आता तुर्भे, घणसेली व ऐरोली येथील फेरीवाल्यांचे सर्वेक्षण बाकी आहे. एकूण सहा हजार ३७१ फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मार्चपर्यंत फेरीवाला सर्वेक्षण पूर्ण केले जाणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’ला दिली आहे.

उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून १५० मीटपर्यंतच्या हद्दीत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मनाई केली आहे. नवी मुंबईत मात्र आजही काही स्थानकांच्या परिसरात फेरीवाले आहेत.

शासन व न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि फेरीवाला धोरणानुसार सर्वेक्षण केले जात आहे. फेरीवाला सर्वेक्षणासाठीच्या अ‍ॅपमध्ये फेरीवाल्याचा आधार क्रमांक टाइप केल्यानंतर एक ओटीपी क्रमांक फेरीवाल्यांच्या लिंक केलेल्या मोबाइलवर जातो. सर्वेक्षकास फेरीवाल्याने तो ओटीपी सांगितल्यावर आधारकार्ड फोटोसह अ‍ॅपमध्ये नोंदवले जाते. त्यानंतर फेरीवाल्यांचे व्यवसाय करताना दोन बाजूंनी छायाचित्र टिपले जाते. त्यानुसार जागेचा अक्षांश रेखांश अ‍ॅपमध्ये समाविष्ट झाल्यानंतरच फेरीवाल्याचे सर्वेक्षण पूर्ण होते.

सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांनी कागदपत्रांची जमवाजमव करायला सुरुवात केली आहे. सर्वेक्षण झालेल्या फेरीवाल्यांच्या स्कॅनिंगचे काम करण्यात येत आहे. दोन फेऱ्यांनंतर विभाग अधिकाऱ्यांमार्फत फेरीवाल्यांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर नियमावलीत बसणाऱ्या व आवश्यक कागदपत्र असलेल्यांना पात्र ठरवून त्याला परवाना ओळखपत्र मिळणार आहे.

खाऊगल्ल्यांवर गंडांतर

फेरीवाल्यांना परवाना दिल्यानंतर सध्या रस्त्यावरच असलेली खाऊगल्ली बंद होणार आहे. परवानाधारकांनी घरून तयार करून आणलेले पदार्थ विकता येणार आहेत. रस्त्यावरच पदार्थ बनवून विकणाऱ्यांना अन्न व औषध प्रशासनाची परवानगीच मिळणार नसल्याने वडापाव, चायनीज गाडय़ा बंद होणार आहेत.

पहिल्या फेरीतील ज्या २,१३८ फेरीवाल्यांना ओळखपत्र देण्यात आले होते, त्यांना योग्य ठिकाणी जागा दिलेली नाही. पालिका शहर फेरीवाला समितीला विचारात घेऊन सर्वेक्षण करत नाही. त्यामुळे हे सर्वेक्षण चुकीचे होत आहे.

– प्रफुल्ल म्हात्रे, अध्यक्ष, नवी मुंबई हॉकर्स युनियन

३७२१ पहिल्या फेरीतील फेरीवाले

२६५० दुसऱ्या फेरीतील आतापर्यंतचे फेरीवाले

६३७१ आतापर्यंतचे एकूण सर्वेक्षण-

Story img Loader