नवी मुंबई : राज्यातील सर्वात स्वच्छ शहर असा नावलौकिक मिळविलेल्या नवी मुंबई शहरात सध्या जागोजागी दिसणारे कचऱ्याचे ढीग आणि स्वच्छतेच्या आघाडीवर दिसणाऱ्या दिरंगाईमुळे स्वच्छ नवी मुंबई मोहिमेचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे चित्र पुढे येऊ लागले आहे. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा यांसारख्या उपनगरांमधील अनेक भागांत घाणीचे साम्राज्य पसरल्याचे चित्र असून एरवी स्वच्छतेच्या आघाडीवर अतिशय दक्ष असणारे महापालिका प्रशासन याकडे काणाडोळा करत असल्याने नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घणसोली तसेच दिघा विभागातील अस्वच्छतेबाबत स्वच्छता निरीक्षकांना नोटिसा बजावण्याची वेळ घनकचरा व्यवस्थापनाचे काम पाहणाऱ्या उपायुक्तांवर ओढवली असून देशात पहिल्या क्रमांकाचे स्वच्छ शहर व्हावे यासाठी वर्षभर दिसणारा प्रशासकीय उत्साहदेखील आता मावळल्यासारखे चित्र पाहायला मिळत आहे. केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार अस्तित्वात आल्यापासून त्यांनी जाहीर केलेले स्वच्छ भारत अभियान हे नेहमीच चर्चेत राहिले. देशातील नियोजित शहरांपैकी एक असलेल्या नवी मुंबई शहराने अगदी सुरुवातीपासून केंद्र तसेच महाराष्ट्र सरकारने आखलेल्या या अभियानात आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. राज्यातील सर्वात स्वच्छ आणि नीटनेटके शहर म्हणून नवी मुंबईला अनेक वेळा गौरविण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत देशातील सर्वात स्वच्छ शहर व्हावे यासाठी नवी मुंबई महापालिकेने केलेले प्रयत्नही वाखाणले गेले. मध्य प्रदेशातील इंदोर शहराला गेली काही वर्षे सलग सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळत आहे. या शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थेने स्वच्छतेच्या आघाडीवर नागरिकांमध्ये रुजवलेली मानसिकता यासाठी महत्त्वाची ठरल्याचे बोलले जाते. अभिजित बांगर यांच्याकडे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्तपद असताना त्यांनी नेमके याच मुद्दयावर बोट ठेवत वेगवेगळी अभियाने शहरात राबविली.
हेही वाचा : खारघरमध्ये महत्त्वाकांक्षी भारत-आफ्रिका व्यापार केंद्र प्रकल्प, रोजगारनिर्मितीला हातभार
शहरातील सिडको वसाहती, गाव-गावठाण, झोपडपट्ट्यांमध्ये स्वच्छता मोहीम तसेच रंगरंगोटीची कामे हाती घेतली. आपले शहर देशातील क्रमांक एकचे स्वच्छ शहर असावे यासाठी महापालिका ठरवून पावले उचलत असल्याची भावना या काळात नागरिकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. रस्त्यावर, गटारांमध्ये कचरा फेकणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. महापालिकेची संपूर्ण यंत्रणा या काळात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत होते. असाच उत्साह राजेश नार्वेकर यांच्या काळातही दिसला. गेल्या काही महिन्यांपासून मात्र शहरातील ठरावीक उपनगरांमध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग, घाणीचे साम्राज्य दिसू लागल्याने महापालिकेचा हा विभाग पूर्णपणे कोलमडला असल्याचा सूर उमटू लागला असून शहर स्वच्छतेच्या नावाने तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत.
कोपरखैरणे, घणसोली, दिघ्यात घाणीचे साम्राज्य
विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीपासूनच शहरातील ठरावीक उपनगरांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. घणसोली, कोपरखैरणे, महापे, दिघा, ऐरोली या उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढीग दिसू लागले असून असे चित्र पाहण्याची सवय नसलेल्या नवी मुंबईकरांना यामुळे आश्चर्याचा धक्का बसू लागला आहे. दिघा, ऐरोली भागात वेळेवर कचरा उचलला जात नसल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. महापालिकेने मध्यंतरी सुक्या आणि ओल्या कचऱ्याच्या वर्गीकरणासाठी कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला होता. यासंबंधी फारशा हालचाली होत नसल्याने नागरी वसाहतींमधील यंत्रणाही सैलावल्या असून अनेक ठिकाणी कचऱ्याचे वर्गीकरण केले जात नसल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. एरवी अगदी वक्तशीर असणारी महापालिकेच्या घनकचरा विभागाची ही यंत्रणा अचानक सैलावली कशी, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा :सीआयएसएफ जवानांकडून डॉक्टरसह कुटूंबियांना मारहाण
परिमंडळ दोनमध्ये कचऱ्याबाबत समस्या वारंवार निदर्शनास येत असून तेथील स्वच्छता निरीक्षक तसेच कचरा वाहतूक ठेकेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. घणसोली तसेच दिघा विभागातील अस्वच्छतेबाबत येथील स्वच्छता निरीक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच कचरा वाहतूक ठेकेदारालाही नोटीस बजावून दंड आकारणी करण्यात येत आहे. दररोज पाहणी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे.
संतोष वारुळे, स्वच्छता उपायुक्त, परिमंडळ २
–