नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रभाव क्षेत्रातील (नैना) शेतकऱ्यांचे प्रश्न अगोदर सोडवा, त्यानंतर विकासाला सुरूवात करा असा आक्रोश नैनाबाधितांच्यावतीने राज्याच्या विधिमंडळात आमदारांनी व्यक्त करुन २४ तास उलटले, तोच सिडको मंडळाने मंगळवारी प्रसिद्धी पत्रक काढून नैना प्रकल्पातील नगररचना ८ ते १२ योजनेतील भूधारकांसाठी नेमलेल्या लवादासमोर सुनावणी सुरू झाल्याची माहिती प्रसिद्ध केली. नैना प्रकल्पाचे काम कोणत्याही पातळीवर थांबणार नसल्याचे संकेत याद्वारे सिडकोने दिले आहेत.

नैना क्षेत्रात १२ नगररचना परियोजना प्रस्तावित आहेत. त्यापैकी परियोजना १ आणि २ यांना अंतिम मंजुरी मिळाली, तर परियोजना ३ ते ७ यांना प्राथमिक मान्यता मिळाली आहे. उर्वरित ८ ते १२ नगररचना परियोजनेकडे सिडकोने लक्ष्य केंद्रीत केले आहे. सोमवारी विधिमंडळातील चर्चेदरम्यान मंत्री उदय सामंत यांनी दिलेल्या उत्तरामध्ये नैना प्रकल्पाविषयी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिवेशन संपल्यावर उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्याचे आश्वासन दिले.

मात्र सिडकोने मंगळवारी आधिवेशन सुरू असताना नैना प्रकल्पाच्या कायदेशीर कारवाईमध्ये वेग आणला. सिडकोने मंगळवारी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात नैना प्रकल्पातील नगररचना परियोजना ८ ते १२ यामधील शेतकऱ्यांनी बेलापूर येथील रेल्वेस्थानकातील टॉवर क्रमांक १० येथील सातव्या मजल्यावर लवाद कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. या कार्यालयात मागील काही दिवसांपासून भूधारकांची लवादासमोर सुनावणी प्रक्रिया सुरू आहे.

लवाद सुनावणी महत्त्वाची

भूधारकांनी या सुनावणी प्रक्रियेत सहभाग घेऊन त्यांची मते मांडावीत, भूधारकांनी येताना आवश्यक कागदपत्रे सुद्धा आणावीत, तसेच ज्या भूधारकांना वाटप झालेल्या भूखंडांबाबत आक्षेप आहे, अशांनी लवादांसमोर सुनावणी दरम्यान त्यांची भूमिका मांडावी असे सिडकोने प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट केले आहे. सिडकोने लवादा मार्फत पारदर्शक प्रक्रिया राबवून भूधारकांच्या आक्षेपांचे निराकरण करण्याची तयारी दर्शवली आहे. अंतिम भूखंड मालकीबाबत स्पष्टता मिळवण्यासाठी सुद्धा लवाद सुनावणी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.