कळंबोली, रोडपाली वसाहतीमध्ये घातक रसायनांनी भरलेली अवजड वाहने सध्या उभी केली जात असल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही वाहने या वसाहतीपासून दूर करावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी वाहतूक पोलिसांकडे केली आहे.
कळंबोली नोडचा विस्तार करून सेक्टर १२ ते २० हा परिसर रोडपालीच्या हद्दीमध्ये वसविण्यात आला. येथे मोठय़ा इमारती बांधण्यात आल्या, परंतु येथील इमारतींच्या समोरील रस्त्यांवर शेकडो वाहनांमुळे रहिवाशांचा श्वास कोंडला आहे. रस्त्यांवर चालणे मुश्किल झाले आहे. ही रसायनांनी भरलेली अवजड वाहने रस्त्याकडेला उभी करून त्याच ठिकाणी स्वयंपाक बनविणे, येथील तलावात आंघोळ करणे, वाहने धुणे हे चित्र नेहमी दिसते. सिडकोने २० कोटी रुपये खर्च करून येथे रस्ते बांधले आहेत. मात्र या रस्त्यांचा ताबा या वाहनांनी घेतला आहे. रस्त्याकडेला बेकायदा गॅरेज, ढाबे आणि वाहनतळही निर्माण झाले आहे. प्रत्येक चौकात ढाबे, त्यावर बसणारे मद्यपी यामुळे नागरिक हैराण आहेत. वाहनतळाच्या प्रश्नावरून रोडपाली गावातील ग्रामस्थ आणि शिख समुदाय यांच्यामध्ये दंगल झाली होती. त्यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न परिसरात निर्माण झाला होता. विशेष म्हणजे या परिसरात वाहतूक पोलिसांची टोचनगाडी कधी येत नाही. ही गाडी कळंबोली परिसरातील मुख्य रस्त्यावरील दुचाकींना सावज करून त्यांच्याकडून चिरीमिरी घेणे पसंद करते. रस्त्यावर उभे करण्यात येणारे घातक रसायनांचे टॅंकर व अवजड वाहने दूर करावी, अशी मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप जगदाळे यांच्याकडे केली आहे.

Story img Loader