पर्यावरण अहवालात नोंद; नागरीकरणाचा शेतीला मोठा फटका
संतोष सावंत
पनवेल : येऊ घातलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ व ‘एमएमआरडीए’च्या कक्षेत पनवेल शहर व तालुका आल्याने एकाच वेळी सिडको, एमएमआरडीए, महापालिका, रायगड जिल्हा परिषद आणि नैना प्राधिकरण आदींनी विकास आराखडे अमलात आणण्यास सुरुवात केली. त्यामुळे पनवेलमधील पारंपरिक शेतीवर मात्र नांगर फिरला गेला. गेल्या सात वर्षांत सुमारे ३१ चौरस किलोमीटर (सुमारे ३००० हेक्टर) क्षेत्रावरील शेती बंद झाली असून काही जमीन नापीक झाल्या आहेत.
पनवेलच्या पर्यावरण अहवालात हा मुद्दा अधोरेखित केला आहे. याबाबत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार पनवेल तालुक्यात भातपीक हे महत्त्वाचे पीक घेतले जात होते. १४ वर्षांपूर्वी पनवेल तालुक्यामध्ये १२ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जात होती. यात घट होत आज तालुक्यात पावणे आठ हजार हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड केली जाते. या काळात सुमारे साडेचार हजार हेक्टरवर भात लागवड बंद करून अनेकांनी आपली शेती विकली तर काहींची नापीक झाली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील वसाहती एकमेकांना जोडणारे रस्ते हेच या शहराची मुख्य धमनी आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ अ, जेएनपीटी ते कळंबोली आणि कळंबोली ते कल्याण शिळफाटा रस्ता हे सर्व रस्ते एकमेकांना जोडले गेल्याने दळणवळणाचा महत्त्वाचा प्रश्न सुटला आहे. सध्या कळंबोली सर्कल, रोडपाली नाका, नावडेफाटा, नवीन पनवेल ते सुकापूर या ठरावीक मार्ग वगळता वाहतूक कोंडीची समस्या अन्य ठिकाणी नाही. तसेच पनवेलमध्ये भविष्यातील मुंबई वडोदरा महामार्ग, विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, मुंबई-हैद्राबाद बुलेट ट्रेन या प्रकल्पांचे भूसंपादनाचे काम सुरू आहे. गेल्या सात वर्षांत वेळोवेळी वाढीव चटई क्षेत्रात सरकारने केलेल्या वाढीव सुविधांमुळे सिडको तसेच खासगी बांधकाम व्यावसायिक परवडणाऱ्या घरांचे प्रकल्प आणत असल्याने नागरीकरण झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे येथील शेतजमिनींचा विकास शहरीकरणात झाल्याची नोंद पर्यावरण अहवालात म्हटले आहे. जेवढय़ा वेगाने शहरीकरण झाले त्या तुलनेत येथील पिण्याच्या पाण्यासाठी जलस्रोताचे प्रमाण तेवढेच राहिले असेही अहवालात म्हटले आहे. हेच कारण येथील शेतीही नष्ट होण्याचे कारण असल्याचे म्हटले असून याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
पाणथळ आणि पक्षी संवर्धन महत्त्वाचे
पनवेल तालुक्याच्या सौंदर्यात भर पडली ती कर्नाळा पक्षी अभयारण्यामुळे. मात्र प्रत्येकाला हवेहवेसे वाटणारे हे सुमारे अडीचशे प्रजातींचे पक्षीदर्शन हे आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला बाधक ठरणार आहेत. त्यामुळेच येथील कांदळवनांची पुनर्रोपन अन्य जागेवर करण्याच्या सूचना नुकत्याच करण्यात आल्या आहेत. ही सर्व स्थिती पनवेलच्या पाणथळांचे रक्षण करण्यास आणि पक्ष्यांचा संचारास अडचणीची ठरणारी आहे. याविषयी शासनाने एकत्र येऊन मार्ग काढण्याची मागणी अनेक पक्षी व पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
वेलवर्गीय शेतीकडे कल
मजुरांची उपलब्धता न होणे, नैसर्गिक संकटे, वाढते शहरीकरण आणि औद्योगिकीकरण तसेच रेल्वे, महामार्ग आणि सिडको व इतर गृहनिर्माण प्रकल्पांसाठी जमिनींचे होणारे संपादन ही शेतीचे क्षेत्र कमी होण्याची मुख्य कारणे असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी ईश्वर चौधरी आणि रवींद्र पाचपुते यांनी सांगितले आहे. मात्र शेतकरी वेलवर्गीय पालेभाजी पिकांकडे वळला आहे. सध्या तालुक्यात सुमारे सहाशे हेक्टर क्षेत्रावर कारली, डोडकी, काकडी, मिरची, दुधी यांसारख्या भाज्यांचे पीक शेतकरी घेत असल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे.