दुचाकीसोबत दोन हेल्मेट खरेदीची सक्ती पनवेलमधील शोरूम मालकांना करण्यात आली आहे. परिवहन विभागाने हेल्मेट वापरणे बंधनकारक केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी आनंद पाटील यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.
त्यामुळे दुचाकीच्या किमतीसोबत हेल्मेटच्या दोन ते अडीच हजार रुपयांच्या रकमेचाही समावेश करण्यात येत असल्याचे एकूण चित्र सध्या शहरात आहे.
पनवेल तालुक्यात ६० हजार दुचाकी आहेत. तसेच विविध नामांकित दुचाकी विक्रींच्या शोरूममधून दररोज २०० दुचाकींची सरासरी विक्री होते. परिवहन विभागाने या दुचाकींच्या शोरूम मालकांना व कंपन्यांना दुचाकींच्या विक्री वेळी दोन हेल्मेट पुरविण्याविषयीची सक्ती केली आहे. संबंधित दुचाकी प्रादेशिक परिवहन विभागात (आरटीओ) नोंदणीसाठी येताना दोन हेल्मेट दाखविण्याची जबाबदारी नोंदणीकर्त्यांवर राहणार आहे. या आदेशामुळे भविष्यात दुचाकींचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी दुचाकींसोबत हेल्मेट मोफत द्यावे, अशी मागणी दुचाकीस्वारांकडून होत आहे. नवीन दुचाकी विकत घेण्यासोबत शिकावू अनुज्ञप्ती (लायसन्स) मिळविताना संबंधित शिकावू दुचाकीस्वाराला हेल्मेट वापराची हमी बंधपत्रातून आरटीओला देणे बंधनकारक राहणार आहे.
पनवेल प्रादेशिक विभागाने हे आदेश सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पनवेल आणि पेण अशा उपप्रादेशिक कार्यालयांच्या प्रमुखांना दिले आहेत. दुचाकी विकणाऱ्या शोरूम व्यवस्थापनाने हेल्मेट सक्ती असली तरीही हा खर्च दुचाकी खरेदी करणाऱ्या व्यक्तींनी उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
याबाबत शरयू होंडा या कंपनीचे व्यवस्थापक शैलेश जगताप म्हणाले, की होंडा कंपनी सुरक्षेसाठी अनेक उपक्रम राबवते, हेल्मेट हा वैयक्तिक सुरक्षेसाठी वापरण्याचा भाग असल्यामुळे तो खर्च संबंधित दुचाकी विकत घेणाऱ्या व्यक्तीनेच करणे गरजेचे आहे. दुचाकींचे उत्पादन करणारी कंपनी तो खर्च उचलणार नाही. त्यामुळे दुचाकींचे दर तेच राहतील पण हेल्मेट सक्तीमुळे दुचाकी खरेदी करणाऱ्यांना हेल्मेटचा खर्च करावा लागेल.

Story img Loader