न्यायालयाने नियमांचे र्निबध लादल्याने पनवेलमध्ये दहीहंडी उत्सव मंडळांनी यंदा पारितोषिकाची रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत केली. पनवेल तालुक्यात पोलिसांनी रबविलेल्या जनजागृतीला मंडळांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यात २१३ दहीहंडय़ांपैकी १८१ मंडळांनी न्यायालयाने केलेल्या सूचनेनुसार दहीहंडय़ा उभारल्या.
पनवेल शहरात सकाळपासूनच दहीहंडी उत्सव मंडळाचा उत्साह ओसंडून वाहत होता.  मानाची समजली जाणारी बापटवाडय़ातील दहीहंडी सोहळा पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. सिडको वसाहतींमधील हंडय़ा मोठय़ा बक्षिसांच्या होत्या. सालाबादाची सलामीच प्रथा यंदाही कायम होती त्यामध्ये प्रत्येक मंडळांनी तीन ते पाच थर लावून तीन हजार रुपयांची कमाई केली. कळंबोली येथील जगदीश गायकवाड, नवीन पनवेल येथील संतोष शेट्टी यांच्या प्रसिद्ध हंडय़ांना नियमांचे पालन करण्यासाठी या वेळी आपली जागा बदलावी लागली. तालुक्यामध्ये कोणताही रस्ता न अडविता २१३ दहीहंडय़ांपैकी १८१ मंडळांनी हंडय़ा उभारल्या. नवीन पनवेल येथील नगरसेवक संदीप पाटील यांनी हंडीच्या बक्षिसाची २५ हजार रुपयांची रक्कम दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून तहसीलदार दीपक आकडे यांच्याकडे सुपूर्द केली. कळंबोली येथील बिमा कॉम्प्लेक्स मंडळाला पोलिसांनी गौरविलेल्या २०१४ विघ्नहर्ता पुरस्कारातून मिळालेले पाच हजार रुपयांची रक्कम आणि दहीहंडीच्या वर्गणीतून जमा झालेली रक्कम असा ५१ हजार रुपयांचा निधी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारकडे जमा करणार असल्याचे मंडळाकडून रविवारी जाहीर करण्यात आले. तालुक्यातील मंडळांनी दहीहंडी साजरी करत साामाजिक बांधीलकी जपल्याचे चित्र पाहायला मिळाले.