अलिबाग आणि उरण या दोन तालुक्यांतील प्रवासासाठी करंजा ते रेवस अशी जलप्रवासाची सोय असून अवघ्या पंधरा मिनिटांत उरण ते अलिबाग हा प्रवास होतो. या प्रवासासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने प्रवासी करात १ रुपयावरून दोन रुपये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे १२ रुपये ५० पैसे असलेले तिकीटदर १३.५० पैसे इतके झाले आहे. काही महिन्यांपूर्वीच या प्रवासासाठी पाच रुपयांनी तिकीटदरात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे नव्याने एक रुपयाची वाढ केल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर ज्या कारणासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाकडून प्रवासी कर आकारला जातो, त्यानुसार प्रवाशांना सुविधा उपलब्ध होत नसल्याने दरवाढ मागे घेण्याची मागणी प्रवासी संघटनेने केली आहे.
अलिबाग हे रायगड जिल्ह्य़ाचे मुख्यालय असून उरणवरून अलिबागला जाण्यासाठी रस्ते मार्गाने साठ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. त्यामुळे वेळ, इंधन वाया जाते. त्यामुळे दररोज ८०० पेक्षा अधिक प्रवासी उरण ते अलिबाग असा प्रवास करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाला दररोज १ रुपयाप्रमाणे प्रवासी कर मिळत होता. यामध्ये मेरिटाइम बोर्डाने वाढ करून एक रुपयाचा सेस लावला असल्याची माहिती मोरा येथील मेरिटाइम बोर्डाचे बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली आहे. तसेच या वर्षीच्या पावसाळ्यातही प्रवाशांना कोणताही त्रास न होता, सुखकर प्रवास करता आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या दरवाढीचा फटका दररोज कामानिमित्त जाणाऱ्या प्रवाशांना बसला असल्याने प्रवासी संघटनेचे आशीष घरत यांनी सुविधा उपलब्ध न करताच मेरिटाइम बोर्डाकडून ही वाढ केल्याने दरवाढ रद्द करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या जलमार्गामुळे उरण ते अलिबागमधील प्रवास करणे सुखकर होत असले तरी १५ मिनिटांच्या प्रवासासाठी सातत्याने दरवाढ केली जात असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करीत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा