दिवाळे
भैरीदेव आणि त्याचा गावात साजरा होणारा उत्सव ही बेलापूरच्या कुशीत असणाऱ्या दिवाळे गावाची ओळख. समुद्राने तीनही बाजूंनी वेढलेल्या आणि नवी मुंबईच्या टोकाला वसलेल्या या गावाने आपले ‘गावपण’ आजही जपले आहे. मच्छीमारांच्या या गावातील नावाडी आणि खलाशी आजही प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना मुंबईतूनही बोलावणे येते. टेकडीवर असल्यामुळे येथे गावठाण विस्तार झाला नसला आणि बेकायदा बांधकामे होऊन बजबजपुरी झाली नसली, तरी सिडकोने आपल्या गावाकडे दुर्लक्ष केल्याचा सल गावकऱ्यांच्या मनात आहे.
दिवाळीच्या आदल्या दिवशी भर समुद्रात प्रकट होणारा भैरीदेव आणि त्याचा गावात साजरा होणारा उत्सव ही बेलापूरच्या कुशीत असणाऱ्या दिवाळे गावाची खास ओळख.. त्याची आख्यायिका सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे वसुबारसेच्या दिवशी दिवाळे गावात प्रचंड गर्दी होते. माहुल आणि घारापुरीच्या मधोमध दरवर्षी सापडणारी भैरीदेवाची मूर्ती वाजतगाजत गावात आणली जाते. त्याची विधिवत पूजा-अर्चा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी या देवाचे विसर्जन केले जाते. त्यानंतर गावात दिवाळी साजरी केली जाते. त्यामुळे भैरीदेवाचे गाव अशी या गावाची ओळख झाली आहे. चारही बाजूने समुद्र आणि उंच टेकडीवर असणारे दिवाळे गाव म्हणजे निर्सगाची एक सुंदर कलाकृती होती. आता त्याचे स्वरूप बदलले आहे.
नवी मुंबईची भौगोलिक रचना स्पष्ट करताना दिघा ते दिवाळे अशी केली जाते. ठाण्याच्या बाजूने दिघा या गावापासून नवी मुंबई सुरू होते, तर बेलापूरच्या बाजूने दिवाळे गावात या शहराची हद्द संपते. चारही बाजूंनी समुद्राचे खारे पाणी आणि मधोमध २० मीटर उंच असलेल्या टेकडीवर दिवाळे गाव वसले आहे. आता उत्तर बाजूने नगरीकरण झाले आहे, पण तीन बाजूंनी आजही खळखळणारा समुद्र गावाची शान कायम ठेवून आहे. पूर्वेस खाडीच्या पल्याड डोंगराच्या जवळ जेथे आज आर्टिस्ट व्हिलेज वसाहत आहे तिथे आणि खाडीच्या पाण्यावर पश्चिम बाजूस पिकवली जाणारी शेती हे येथील रोजगाराचे साधन.
मासेमारी आणि मजुरी ही रोजगाराची प्रमुख साधने असलेल्या या गावातील खलाशांना मढ, भाऊचा धक्का वगैरे भागातून बोलावणे येते. गावाला खेटून असलेल्या समुद्रामुळे गावाच्या जवळ तस्करीदेखील होत असे. गावात हनुमान, काकादेव, मरीआई, वेताळदेव अशी मंदिरे आहेत. आता ही मंदिरे नागरीकरणात हरवून गेली आहेत, मात्र गाव त्यांचे उत्सव मोठय़ा दिमाखात साजरे करते. सध्या गावात जत्रेचा हंगाम सुरू आहे. हनुमान जयंतीनंतर आठ दिवसांत गावाची दोन दिवस चालणारी जत्रा भरते. त्यासाठी वर्गणी काढली जाते. या यात्रेतील प्रत्येक गावकऱ्याचा सहभाग आजही कायम आहे. पूर्वी २०-२५ कुटुंबांचे असणारे हे गाव आता पाच हजार ग्रामस्थांचे झाले आहे. मासेविक्री हा प्रमुख व्यवसाय आजही कायम असून बेलापूरमधील सर्व शासकीय कार्यालयांतील कर्मचारी या गावातील मासळी आवर्जून विकत घेत असतात.
गावातील भैरीदेवाचा उत्सवही अलीकडे चर्चेचा विषय झाला आहे. ही परंपरा २००-२५० वर्षांपासून सुरू असल्याचे या उत्सवाचे एक मानकरी कृष्णा शांताराम देवकर यांनी सांगितले. तांडेल परिवाराला (सध्या चंद्रकात देवकर) हा देव भर समुद्रातील पाण्यातून आणण्याचा मान देण्यात आला आहे. त्यासाठी या परिवाराबरोबर भर समुद्रात होडय़ा टाकून अख्खे गाव देवाला आणण्यासाठी माहुल घारापुरी परिसरात जाते. बुडी मारून देवाला वर काढले जाते. तांडेल परिवारापैकी बुडी मारून पाण्याबाहेर काढलेल्या मूर्तीची वाजतगाजत गावात पालखी मिरवणूक काढली जाते. तांडेल परिवाराच्या घरी या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ही मूर्ती पुन्हा वाजतगाजत विसर्जित केली जाते. या दिवशी गावातील प्रत्येक कुटुंबाला पालखीचा मान दिला जातो. या उत्सवाची संपूर्ण गाव आतुरतेने वाट पाहते. एखाद वर्षी भैरीदेवाची मूर्ती प्रकट झाली नाही तर गावात दिवाळी साजरी केली जात नाही इतकी या गावाची या देवावर श्रद्धा आहे. जत्रेच्या दिवशी सातरा विधी करण्याची परंपरा आजही कायम आहे. गावातील इडा पीडा टाळण्यासाठी हा सातरा विधी केला जातो.
संपूर्ण शहराला वाळू पुरविणाऱ्या उलवा खाडीजवळही या गावाचे एक श्रद्धास्थान आहे मात्र ते मंदिर समुद्राच्या पाण्यामुळे सहसा कोणाला दिसत नाही, पण दिवाळेकर आजही या मंदिराकडे पाहून हात जोडताना दिसतात. या गावात कोळी समाज मोठय़ा प्रमाणात असला, तरीही १२ बलुतेदारांचे वास्तव्य या गावात आजही आहे. चांगले नावाडी आणि खलाशी असलेल्या या गावातील अनेक तरुण पूर्वी मुंबईतील अनेक बंदरांवर कामासाठी जात. त्यामुळे गावातील काही बुजुर्गानी इंग्रजी भाषा अवगत केली होती.
त्यामुळे गावाच्या चारही बाजूने अघोषित सीमांकन करण्यात आले आहे. उत्तरेला आज संपूर्ण नागरीकरण झाले आहे, पण इतर तीन दिशांना समुद्र आहे. गावाच्या चारही बाजूने समुद्राचे पाणी असल्याने पूर्वी बाजारहाट आणि माध्यमिक शाळेसाठी बेलापूर गावावर अवलंबून राहावे लागत असे. शाळेत जाताना ओहोटीची वाट पाहावी लागे. त्यानंतरच खाडी पार केली जात असे. गावाला भक्कम नेतृत्व न मिळाल्याने गावाचा विकास काही प्रमाणात खुंटला आहे, पण गावातील एकता, बंधुता आणि जिव्हाळा आजही कायम आहे.
सिडकोने उपेक्षित ठेवल्याची भावना
७०च्या दशकात सिडकोचे आगमन झाले आणि काही ग्रामस्थांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या, मात्र या गावाकडे सिडकोने आजही दुर्लक्ष केल्याची भावना ग्रामस्थांच्या मनात कायम आहे. गावात एकही बेकायदा बांधकाम नाही, असे येथील ग्रामस्थ अभिमानाने सांगतात. टेकडीवर गाव असल्याने गावठाण विस्तार झालेला नाही.
अमीन शहा बाबाचा दर्गा
या गावात एकही मुस्लीम कुटुंब नाही, पण गावाच्या दक्षिण बाजूस एक अमीन शहा बाबाचा दर्गा आहे. त्या दग्र्यावर आजही सर्वात आधी गावाची चादर चढवली जाते.