नवी मुंबई : लग्नाच्या आधी एचआयव्हीग्रस्त असल्याची बाब होणाऱ्या पत्नीपासून लपवून ठेवल्याप्रकरणी एकाविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नाआधी ‘एचआयव्ही’वर उपचार सुरू असल्याची माहिती तरुणाने तिच्यापासून लपवून ठेवल्याचे तक्रारदार युवतीने म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले.
पनवेल परिसरात राहणाऱ्या एका युवतीचा विवाह कल्याण येथील तरुणाशी २०१६ मध्ये झाला. विवाहानंतर पतीच्या प्रकृतीविषयी काही नातेवाईकांनी चौकशी सुरू केली होती. त्यात त्याला काही नातेवाईक आणि कुटुंबीय औषध घेण्याची आठवण करून देत होते. त्याच्या जेवणाविषयीही कुटुंबातील काही लोक अधिक काळजी घेतले जात होते. याबद्दल तक्रारदार तरुणीने चौकशी सुरू केली. तिचे पती नेमकी कोणत्या प्रकारची औषधे घेतात वा त्यांच्या जेवणाविषयी अधिक खबरदारी का घेतली जात आहे, याबद्दल तरुणीने विचारणा केली. मात्र कुटुंबातील सदस्यांनी तिला प्रतिसाद दिला नाही.
काही दिवसांपूर्वी पती खूपच आजारी पडल्यानंतर त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले. त्या वेळी तो एचआयव्हीग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले. यावर फिर्यादीने संताप व्यक्त केल्यावर तिला कुटुंबातील सदस्यांनी त्रास देण्यास सुरुवात केली. उलट याची कोठेही वाच्यता केल्यास परिणाम भोगावे लागतील, असे धमकावण्यात आले. दरम्यान तक्रारदार तरुणीही आजारी पडल्याने तिच्यावर उपचार सुरू करण्यात आले. वैद्यकीय अहवालात तीसुद्धा एचआयव्हीग्रस्त असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी या साऱ्या प्रकाराची माहिती लपवून ठेवली. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे तरुणीने सांगितल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.