नवी मुंबई – गेल्या कित्येक वर्षांपासून कांदळवनामुळे नवी मुंबई शहरातील धारण तलावांची स्वच्छता रखडली आहे. यंदा तरी कांदळवनाचा निर्णय होऊन धारण तलावांची स्वच्छता होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. परंतु, यंदाही स्वच्छता होणार नाही. महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटी (एमसीझेडएमए) याबाबत सविस्तर अभ्यास करून प्रस्ताव सादर करणार आहे. याला आणखी ३ महिन्यांचा कालावधी लोटणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहरात धारण तलाव हे सिडकोने शहरातील पाण्याचा निचरा होण्यासाठी बांधले होते. परंतु गेले २५ ते २६ वर्षे त्यामधील गाळ न काढल्याने कांदळवन वाढले आहे. त्यामुळे त्याची स्वच्छता रखडली आहे. यंदा शहरातील धारण तलावांची स्वच्छता होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती.

महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथरिटीचा (एमसीझेडएमए) धारण तलावात असणारे कांदळवन आणि त्याची स्वच्छता याबाबत सविस्तर अभ्यास सुरू आहे. ही संस्था वेगवेगळ्या स्थितीत याची पाहणी करून टिप्पणी करीत आहे. उन्हाळ्यामध्ये धारण तलावातील कांदळवनाची काय परिस्थिती आहे, पावसाळ्यात काय परिणाम होतात, भरतीमध्ये पर्यावरण आणि जैवविविधतेवर काय परिणाम होतो. याबाबत एमसीझेडएमएचा अभ्यास सुरू असून याकरिता आणखी ३ महिने जाणार आहेत. त्यांनतर एमसीझेडएमए अहवाल सादर करून धारण तलाव स्वच्छता आणि कांदळवन याबाबत परवानगी देईल, अशी माहिती महापालिका शहर अभियंता संजय देसाई यांनी दिली आहे.

हेही वाचा – नवी मुंबई: श्वानाला घेऊन फेरफटका जीवावर बेतला….

स्वयंचलित दरवाजे लावून शहरात पाणी न तुंबण्याची दक्षता

पावसाळ्यात शहरात पाणी तुंबणार नाही यासाठी धारण तलावात स्वयंचलित दरवाजे बसविण्यात येणार आहेत. तसेच शहरात पाणी साचणार नाही यासाठी नाल्यांची सफाई करण्यात येत आहे. शिवाय धारण तलावातील पाण्याचा निचरा होण्यासाठी योग्य व्यवस्था केली जाणार आहे. अशाप्रकारे शहरात पाणी तुंबणार नाही याची खबरदारी घेण्यात येईल, अशी माहिती महापालिकेने दिली आहे.