जगदीश तांडेल
उरण: होळीच्या निमित्ताने सोमवारी रेवस-करंजा खाडीत मच्छिमारांनी आपल्या बोटी(होड्या)सजवून त्यांची विधिवत पूजा करून भर समुद्रात आनंदात होळी साजरी केली. यावेळी मच्छिमारांनी आपल्या बोटी पताका आणि नव्या साड्यांनी सजविल्या होत्या. होड्यांवर स्पीकर, बँड वाजवीत वाजत गाजत, होडीतूनच एकमेकांवर रंगाची उधळण करीत कुटुंबातील महिला, मुली, लहान मुलं आदी मिळून ही दर्यावरील होळी साजरी करतात. तसेच होळीतील परंपरागत आरोळ्या देत ही होळी साजरी केली जाते.
आणखी वाचा- होळी आणि शिमग्याच्या पारंपरिक प्रथा आणि खेळांचा अस्त ? उरण मधील गावांचे निमशहरात रूपांतर
जीवावर उदार दर्या(समुद्र)वर स्वार होऊन वर्षभर मासेमारी करणाऱ्या कोळी समाजात होळी हा सण नारळी पौर्णिमेइतकाच उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. त्याचा आनंद घेत होळीच्या दिवशी आपल्या रोजीरोटीचे साधन असलेल्या बोटींची सजावट केली जाते आणि घरातील महिलांच्या हस्ते त्यांची पूजा केली जाते. बोटीच्या नालीला(समोरील भागाला)जास्तीत जास्त मोठा मासा बांधून त्याचीही पूजा करतात. त्यानंतर आनंदात समुद्रावर होळी साजरी करून झाल्यानंतर सायंकाळी बोटीला बांधलेला मासा काढून तो कापून त्याचे सगेसोयरे, नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यात वाटप करण्यात येते.
मासळीच्या दुष्काळाचा परिणाम
होळीच्या उत्सवावर मासळीच्या दुष्काळाचे सावट आहे. मासेमारी करीत असताना मेहनत करूनही इच्छित मासळी मिळत नाही. त्यामुळे अनेक बोटींना परंपरा म्हणून छोटे मासे लावावे लागत असल्याचे मत येथील कोळी बांधवांनी व्यक्त केले आहे.