नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका शिक्षण विभागात कायमस्वरूपी शिक्षकांबरोबर ठोक मानधनावर काम करणारे शिक्षकही मोठय़ा प्रमाणात आहेत. समान काम समान वेतन अशी या शिक्षकांची मागणी आहे. त्यात सुट्टीकाळातही या शिक्षकांना पगार मिळत नसल्याने आमच्यावर हा अन्याय का असा सवाल या शिक्षकांनी केला आहे.
आम्हीही शिक्षक असून पालिकेच्या प्राथमिक विभागात शिक्षणाचेच काम करतो. अनेक वर्षे काम केल्यावरही ठोक मानधनावर म्हणून सुट्टीत पगार दिला जात नाही. कायम शिक्षकांना मात्र उन्हाळी सुट्टी म्हणून घरी बसून पूर्ण पगार दिला जातो. हा आमच्यावर अन्याय आहे. करोनाकाळातही कायम शिक्षकांप्रमाणेच काम केले आहे. शिक्षण घेऊन अशी अवहेलना अतिशय वेदनादायक असल्याचे ठोक मानधनावरील प्राथमिक शिक्षक सिद्धराम शिलवंत यांनी सांगितले.
राज्यात महापालिका शाळांत पटसंख्या कमी होत असताना नवी मुंबई पालिकेच्या शाळांत मात्र चांगली पटसंख्या आहे. यासाठी कायमस्वरूपी शिक्षकांसह हे ठोक मानधनावरील शिक्षक काम करीत आहेत. मात्र ठोक मानधनावर असलेल्या शिक्षकांना काही पटीत कमी पगार मिळत आहे. त्यामुळे समान काम करत असल्याने समान काम समान वेतन देण्याची हे मागणी शिक्षक करत आहेत. करोनाकाळात अत्यावश्यक सेवा म्हणून सर्वानाच करोनाचे काम करावे लागले. तेव्हाही मानधनावरील शिक्षकांनी काम केले आहे. या शिक्षकांना महिन्यातून फक्त एक सुट्टी घेता येते .त्यापेक्षा अधिक सुट्टी घेतल्यास त्या दिवसाचे मानधनही कापले जाते. दिवाळी व उन्हाळी सुट्टीचे मानधन त्यांना दिले जात नाही. शाळेचा निकाल चांगला लागावा यासाठी सर्वच शिक्षक मेहनत घेत असताना पगारातील तफावतेमुळे शिक्षकांमध्ये असंतोष आहे. याबाबत योग्य निर्णय घेण्याची मागणी होत आहे.
सद्या लहान मुलांचे लसीकरण सुरू आहे. शाळांना सुट्टी लागली असून शाळा सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के लसीकरण करण्याचे नियोजन आहे. यासाठी सुट्टी काळात शिक्षकांची या कामात मदत घेतली जाणार असून त्यांना मानधन दिले जाणार आहे. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका

Story img Loader