चोरटे चोरी करण्यापूर्वी त्या घरात कोण राहते कधी कामाला जातात याचा शोध घेतात. संपूर्ण माहिती गोळा करतात ज्याला पोलिसी भाषेत रेकी म्हणतात. अशाच पद्धतीच्या चोऱ्या सध्या वाढल्या आहेत. बंद घरे फोडून चोरी करण्याचे प्रकार वाढले आहेत. नवी मुंबईतील सीबीडी येथेही असाच एक चोरीचा प्रकार घडला आहे.
तेजपाल सिंग हे सेक्टर ५ सीबीडी येथे वडिलांसोबत राहतात. त्यांचे वडील हे ट्रक चालक असून काही दिवसांपूर्वी आसाम येथे ते माल घेऊन गेले होते. तेजपाल हे एका कंपनीत रात्रीची नौकरी (नाईट ड्युटी) करतात. शुक्रवारी नेहमीप्रमाणे गेट व घराला व्यवस्थित कुलूप लावून ते नोकरीच्या ठिकाणी गेले. दुसऱ्या दिवशी घरी आले त्यावेळी घराचे गेट उघडे दिसले तसेच घराच्या दरवाज्याचे कडी कोयंडा तुटलेल्या अवस्थेत होते. आत गेल्यावर सर्व कपडे समान अस्ताव्यस्त होते. त्यांनी कपाट तपासले असता सोन्याची साखळी, कर्णफुले, सोन्याचे अंगठी चांदीची नाणी , घड्याळ आणि एक हजाराची रोकड असा ८० हजार ६०० रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा : उरण मधील आदिवासीना जातीचे दाखले; उरण सामाजिक संस्थेचा उपक्रम
विशेष म्हणजे या बाबत फिर्यादी यांनी शेजाऱ्यांना विचारणा केली असता त्यांना काहीही माहिती नाही असे उत्तर मिळाले. वास्तविक आपल्या शेजारील घरात रात्री कोणी नाही हे माहिती असताना शेजारधर्म म्हणून सावध राहिले जात नाही अशी खंत माहिती देताना पोलिसांनी व्यक्त केली.