स्थानिक नागरीकांची पालिका नगररचना विभागाकडे तक्रार
नवी मुंबई: नवी मुंबई शहर झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढत असताना येथील जागांचे व घरांचे दर करोडोंच्यापटीत गेले आहे. नवी मुंबई शहरात झपाट्याने व वेगवान पध्दतीने वाढणाऱ्या सीवूड्स रेल्वेस्थानक परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. भव्य मॉल व स्थानकाच्या दोन्ही बाजूला एल अन्ड टी कंपनीच्यावतीने सुरु असलेल्या गृहनिर्मिती प्रकल्पामुळे या परिसराला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले असताना दुसरीकडे गृहनिर्मिती प्रकल्प आकारास येत असताना रात्रंदिवस या ठिकाणी बांधकाम सुरु असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरीकांनी पालिका व पोलीस विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे पालिकेच्या नगररचना विभागाने या प्रकल्पाला दिवसरात्र कामाची परवानगी दिली असून आजुबाजूच्या सामान्य नागरीकांना बहिरे करण्याचा विडा उचलला आहे का असा संतप्त सवाल स्थानिकांनी केला आहे.
नवी मुंबई शहर हे राहण्याच्यादृष्टीने महाराष्ट्रातील महत्वाचे शहर मानले गेले असून शहराची रचना तसेच पालिकेने केलेल्या सार्वजनिक सुविधा ,स्वच्छता ,नागरीकांना आवश्यक अत्यावश्यक नागरी सुविधांमुळे या शहराला राहण्यासाठी पसंती मिळताना पाहायला मिळते. त्यामध्ये नेरुळ व सीवूड्स परिसराला आता अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. याच सीवूडस रेल्वेस्थानकाच्या पूर्व पश्चिम दिशेला एल अन्ड टी कंपनीच्यावतीने गृहनिर्मिती प्रकल्प सुरु आहे. या ठिकाणी घरांचे भाव करोंडोंच्या घरात आहे. परंतू या गृहनिर्मिती प्रकल्पाच्यामुळे सीवूड्स पूर्व व पश्चिम या दोन्ही दिशेच्या नागरीकांना त्रास होत असून बांधकाम करण्याची वेळ सायंकाळपर्यंत असताना दुसरीकडे रात्रभर काम चालू ठेवले जात असल्याचा व सातत्याने ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण होत असल्याने पालिकेकडे तक्रार करुनही पालिका अधिकारी दुर्लक्ष करत असून पालिकेनेच रात्रभर काम करण्याची परवानगी दिली आहे काय असा संतप्त सवाल नागरीक करु लागले आहेत.
हेही वाचा >>> नवी मुंबई: सायन पनवेल महामार्गावरील दुरुस्तीमुळे वाहतूक कोंडीचा बोजा पामबीच मार्गावर
रेल्वेस्थानकाच्या परिसरात अनेक वर्षापासून मोठे गृहनिर्मिती प्रकल्प आकारास येत असून या कामामुळे रेल्वेस्थानकाच्या दोन्ही दिशेला धुळीचे साम्राज्य असून सतत रस्त्यावर धुळ पाहायला मिळते. बांधकामामुळे रात्रभर कर्कश आवाज व गोंधळामुळे नागरीकांना अनेक मानसिक व शारीरीक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.याबाबत स्थानिकांनी अनेकवेळा पालिकेकडे पत्रव्यवहार केल्यानंतरही पालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची नाराजी नागरीकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे याविरोधात सदर बांधकाम कंपनी व पालिका अधिकारी यांच्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. याबाबत पालिका नगररचना सहाय्यक संचालक सोमनाथ केकाण यांना संपर्क केला असता संपर्क झाला नाही.
हेही वाचा >>> नवी मुंबई: १५ फेब्रुवारी पर्यंत शीव पनवेल मार्गावरील नेरूळ ते शिरवणे सेवा रस्ता बंद
पालिका अधिकाऱ्यांनी खिसे गरम करुन रात्रभर काम करण्यास परवानगी दिली आहे का….
नवी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार लेखी तक्रार करुन व प्रत्यक्ष भेटून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांनी खिसे गरम करुन रात्रंदिवस बांधकाम करण्याची संबंधितांना परवानगी दिली आहे का? अधिकाऱ्यांना सामान्य नागरीकांची काही देणे घेणे नसून त्यांचे लक्ष लक्ष्मी दर्शनाकडे असल्यामुळे दुर्लक्ष केले जात आहे. याविरोधात वेळ पडल्यास आंदोलन करुन पालिका व कंपनी अधिकाऱ्यांना जाब विचारला जाणार आहे. कंपनी अधिकारी काम बंद असल्याचे खोटे सांगतात पण प्रत्यक्षात रात्री उशीरापर्यंत काम सुरु असते.
संतोष पाटील, उद्धव बाळासाहेब ठाकरे,सेना पदाधिकारी
सीवूडस रेल्वेस्थानक परिसरात सुरु असलेल्या प्रकल्पाचे काम सुरवातीला उशीरापर्यंत सुरु असायचे परंतू आता वेळेत काम बंद केले जाते.
आकाश शर्मा,प्रोजेक्ट मॅनेजर