कळंबोलीच्या अमित वाघमारेचा जीवघेणा अनुभव
ईदची सुटी लागेपर्यंत काही बोलू नका, त्यानंतर त्याला तुरुंगात टाकू आणि तेथून सुटल्यावर त्याचा शिरच्छेद करू, या एका वाक्याने भारतीय मजूर अमित वाघमारे याच्या पायाखालची वाळूच सरकली. सौदी अरेबियातील दमाम येथील फैसलिया या शहरातील वलिद अल फरियान यांच्या कुटुंबीयांमध्ये गेल्या बुधवारी झालेला हा संवाद कानी पडल्यावर अमितने स्वत:ला संपविण्याचा निर्णय घेतला, मात्र अनेकांच्या चांगुलपणामुळे त्याला मायदेशी परतणे शक्य झाले.
कळंबोली येथे राहणारा अमित वाघमारे हा २३ वर्षांचा तरुण. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नेरुळ येथील गुडनेट कंपनीच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी तो सौदी अरेबियातील दमाम येथील फैसलिया या शहरात वाहनचालक पदाच्या नोकरीसाठी गेला. तेथील वलिद अल फरियान यांच्याकडे दोन वर्षांसाठी त्याची नेमणूक करण्यात आली. सुरुवातीची दीड वर्षे अमितला त्रास झाला नाही. मात्र फरियान यांनी मागील दोन महिन्यांपासून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. वाहनचालकाचे काम करण्यासाठी गेलेल्या अमितला वाहन धुण्याचे, घराची साफसफाई करण्याची कामे करावी लागली. हे सर्व तो घरच्यांना फोनवरून सांगत असे, तसेच त्याने आपल्या बहिणीला व्हॉट्सअ‍ॅपवर संदेशही पाठविले होते. गुडनेट कंपनीच्या कार्यालयातही त्याने दूरध्वनी करून हा प्रकार सांगितला. अमित अडचणीत असल्याचे कळल्यावर त्याच्या कुटुंबीयांनी या कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेटही घेतली, मात्र त्यांची बोळवण करण्यात आली. हताश अमितने कराराचा कालावधी संपण्याची वाट पाहाण्याचे ठरवले. मात्र फरियान कुटुंबीयांचा वरील संवाद त्याच्या कानी पडला आणि तो घाबरला. असाहाय्यतेच्या भावनेतून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आणि गुरुवारी सकाळी सहा वाजता मोबाइल फोन व इतर वस्तू घरीच सोडून आत्महत्येच्या हेतूने तो तेथून निसटला. तब्बल दीड किलोमीटर चालल्यानंतर त्याला एक टॅक्सी मिळाली. बहारीन व फैसलिया शहराला जोडणाऱ्या पुलावरून त्याने समुद्रात उडी मारली. मासेमारी करणाऱ्या एका नौकेवरील तरुणांनी त्याला पाण्याबाहेर काढले. त्या वेळी तो बेशुद्ध होता. मासेमारी नौकेवरील हे तरुण कामगार चेन्नईचे होते. या तरुणांनी सौदी अरेबियाच्या तटरक्षक दलाच्या जवानांकडे त्याला सोपवले. या जवानांनी त्याला शासकीय रुग्णालयात भर्ती केले. तेथील डॉक्टरांनी त्याला केवळ वाचवले नाही, तर कपडे, बूट आदी गोष्टींची मदतही केली. तो बरा झाल्यावर हे प्रकरण सौदी पोलिसांकडे गेले. पोलिसांनी लगेचच फरियान यांच्या घराची झडती घेतली. अमितचे निर्दोषत्व सिद्ध झाल्याने पोलिसांनी फरियानना त्याचे तीन महिन्यांचे रखडलेले वेतन व परतीचे विमान तिकीट काढून देण्याचे आदेश दिले. मंगळवारी रात्री फरियान यांनी अमितला दमास विमानतळावर सोडले. बहारीनमार्गे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेपाच वाजता तो मुंबई विमानतळावर उतरला आणि त्याचा जीव भांडय़ात पडला. या प्रकरणामुळे कंत्राटी कामगारांना परदेशी धाडणाऱ्या कंपन्यांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.