पनवेल: सोमवारी पहाटे ते सकाळपर्यंत सहा तासात १२१ मीलीमीटर पावसात कळंबोली वसाहत पाण्याखाली गेली कशी याबाबत महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी पालिकेच्या विविध विभागातील अधिका-यांशी मुख्यालयात बैठक घेऊन चर्चा केली. या चर्चेबाबत आयुक्तांनी अधिकृत कोणतीही माहिती दिली नसली तरी पुढील आठवडाभरात पालिकेच्या विविध विभागाच्या अधिका-यांना कळंबोलीतील पाणी निचरा न होण्यामागील कारणे, त्यावरील उपाय आणि प्रत्यक्ष पाणी अहवालानंतर कायम स्वरुपी पाणी निचरा होण्यासाठी पालिका आपत्ती व्यवस्थापन आराखडा बनविण्याचे निर्देश दिल्याचे सूत्रांकडून समजते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कळंबोली वसाहतीचा विस्तार १ ते २० सेक्टरपर्यंत पोहचला असून वसाहतीसोबत कळंबोली, रोडपाली आणि खिडुकपाडा या गावांचा परिसर या नोडमध्ये येत असून सूमारे अडीच लाख लोकवस्तीचा हा परिसर झाला आहे. महापालिकेच्या मंगळवारच्या पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, स्वच्छता विभागातील विभागप्रमुख, प्रभाग अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी बैठकीत उपस्थित होते. बैठकीत वसाहतीमध्ये नालेसफाई पावसाळ्यापूर्वी झाल्याचा दाव्यासोबत कमी वेळेत जास्त पाऊस पडल्याने आणि तळोजा औद्योगिक वसाहतीमधून वाहणा-या कासाडी नदीपात्रामध्ये आणि पात्राच्या शेजारी अवैध मातीचे भराव टाकल्यामुळे ते पाणी कळंबोलीत शिरल्याचे सांगण्यात आले. तसेच फुडलॅण्ड कंपनीमागील कासाडी नदीपात्रात पाणी जाण्याच्या वाटेवर भराव केल्यामुळे पाण्याचा निचरा होण्याचा मार्ग बंद झाल्याचे पालिका अधिका-यांनी बैठकीत छायाचित्रासह दाखवून दिले. फुडलॅण्ड कंपनीमागील वाडीमध्ये २०० नागरिकांना पालिकेने पूरसदृष्यस्थिती असल्याने सोमवार व मंगळवारी या दोन दिवस दोनवेळचे जेवणे, नेहारी, अंथरुन पाघरुनासह रोडपाली बुद्धविहार येथे स्थलांतरीत केल्याचे बैठकीत सांगण्यात आले. या बैठकीत कासाडी नदीपात्रालगत भराव, मुंब्रा पनवेल महामार्गाला रोडपाली येथील एमएसआरडीसीच्या जागेवरील मातीचा भराव, तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये काही कारखानदारांनी केलेल्या मातीच्या भरावामुळे गाव आणि कारखाने यांच्यातील अंतर कमी झाल्याने पाणी साचण्याची जागा कमी झाल्याचे पालिका अधिका-यांनी बैठकीत सांगीतले. पनवेल महापालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी उपायुक्त कैलास गावडे यांना एमएसआरडीसी प्रशासन, सिडको मंडळ यांना लेखी पत्र देऊन त्यांच्या जागेवरील अवैध मातीचे भराव काढून घेऊन पावसाळी पाणी जाणारे नैसर्गिक वाट करुन देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या नैसर्गिक वाटेने कासाडी नदीचे पाणी कळंबोली वसाहतीमध्ये शिरते तेथे फायबरचे स्वयंचलित गेट महापालिका प्रशासन तेथे बसविल्यास हा प्रश्न सुटेल का याविषयी तपासणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त चितळे यांनी बांधकाम विभागाला दिल्या आहेत. पुढील आठवड्यात याविषयीचा विस्तृत अहवाल आल्यानंतरच प्रसारमाध्यमांना माहिती दिली जाईल, असे आयुक्त चितळे म्हणाले. 

हेही वाचा : तुर्भेत शाळेत चोरी, ९० हजराची रोकड घेऊन चोर फरार 

कळंबोलीतील उदंचन केंद्र उंचीवर आहे. या उंचीवरील केंद्रातील सात मोटारींपैकी तीन मोटार सोमवारी बंद असल्याने सोमवारी कळंबोलीत गुडघाभर साचल्याने बैठ्या वसाहतीमधील शौचालयातून घरात शौच आल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पालिकेकडे करण्यात आल्या. याबाबत पालिका सिडको मंडळाकडे लेखी पत्रव्यवहार करुन विचारणा करणार असल्याच्या सूचना पालिका आयुक्तांनी बैठकीत अधिका-यांना दिल्या. सिडको मंडळाने पनवेल महापालिकेकडे वसाहती हस्तांतरण केल्या परंतू ४५ वर्षांपूर्वीच्या वसाहतीमधील भूमिगत केलेल्या मलनिसारण वाहिनी जिर्ण झाल्या आहेत. सिडको मंडळाने या मलनिसारण वाहिन्यांचे जाळे नवीन टाकणे गरजेचे आहे. उदंचन केंद्राची क्षमता वाढविल्यानंतर पनवेल महापालिकेने त्याचे हस्तांतऱण सिडकोकडून करावे. आठ वर्षे पनवेल महापालिकेच्या स्थापनेला झाली तरी यावर सिडको आणि पनवेल महापालिकेचे एकमत होत नसल्याने सामान्य कळंबोलीकर भरडले जात आहेत.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How kalamboli went under water in 121 mm rain issue raised in panvel municipal corporation meeting css
Show comments