नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात सध्या मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्याशिवाय इतर फळांचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे बाजारात नेहमीच वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते शिवाय शेकडो गाड्यांमधून फळे दाखल होत असतात. या ठिकाणी बाजारात खराब झालेली फळे त्याच ठिकाणी फेकण्यात येतात. बाजारात खराब झालेले कचऱ्यातले सफरचंद उचलून त्याचा रस बनवण्यासाठी उपयोग केला जातोय. अशी धक्कादायक माहिती एपीएमसीतून समोर आली आहे. त्यामुळे तुम्ही पित असलेला रस सुरक्षित आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतमालाची आवक होत असते. सध्या बाजारात मोठ्या प्रमाणावर फळांचा हंगाम सुरू आहे. यामध्ये देशी तसेच विदेशी फळेही दाखल होत आहेत. हापूस, पेर, संत्री, सफरचंद ही दाखल होत आहेत. मात्र बाजारात दाखल होणाऱ्या फळांमधील खराब फळे बाजार आवारातच टाकून दिली जातात. मात्र काही जण ही खराब फळे विकण्यासाठी उचलतात असे प्रकार कित्येकदा समोर आले आहेत. परंतु आता चक्क एपीएमसीतून कचऱ्यात टाकण्यात आलेले सफरचंद उचलून ते रस बनवण्यासाठी वापरले जात आहेत.
हेही वाचा >>> पनवेल: शहर सौंदर्यकरण स्पर्धेत पनवेल पालिका ‘ड’ वर्गात राज्यात पहिली
एपीएमसी बाजारातील असाच एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओ मधील एक व्यक्ती कचऱ्यात फेकण्यात आलेले सफरचंद उचलून ते रस बनवण्यासाठी वापरले जाणार असल्याची स्वतः कबुलीही देत आहे. सध्या वातावरणातील तापमान दिवसेंदिवस वाढत आहे तापमान वाढल्याने उकड्यापासून थंडावा मिळण्यासाठी शीतपेयांना पसंती दिली जाते. यामध्ये नारळ पाणी, लिंबू सरबत विविध प्रकारचे शीतपेय तसेच फळांचा रस यांचा समावेश असतो. अशा प्रकारची फळ वापरून त्याचा बनवलेला रस कितपत दर्जेदार आहे? आणि तुम्ही पित असलेला रस खरंच सुरक्षित आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.