नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामात कठोर डोंगरांना भुईसपाट करण्यासाठी केलेल्या स्फोटांच्या विरोधात बेलापूर येथील नागरिकांनी मानवी साखळी काढत स्फोटामुळे होत असलेले परिसराचे नुकसान आणि ध्वनी प्रदूषणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. बॅनर घेवून विरोधकर्त्यांच्या मानवी साखळीने सीबीडी बेलापूरच्या सेक्टर १५ येथील जॉगर्स ट्रॅकच्या एका टोकापासून सुरुवात केली. यामध्ये ३५० लोकांनी रविवारी सकाळी ९०० मीटर लांब मौन मानवी साखळी तयार केली.
विमानतळ बांधकामात लावण्यात येणारे सुरूंग इत्यादी कारणांमुळे या भागातील इमारतींना भेगा पडल्या आहेत. पडलेल्या भेगा आणि प्रत्येकवेळी होणाऱ्या स्फोटामुळे खिडक्याही खिळखिळ्या झाल्या आहेत. स्फोटामुळे इमारतीला तडे देखील गेले आहेत. वारंवार होणाऱ्या स्फोटांच्या परिणामास्तव भिंतींना पडणाऱ्या भेगा व खिळखिळ्या झालेल्या खिडक्यांच्या काचांमुळे त्रस्त असलेल्या रहिवाशांच्या यातनांना या मानवी साखळीद्वारे शांतपणे वाचा फोडण्यात आली.
हेही वाचा – पनवेल: तळोजातील कारखान्याला आग
एनएमआयए लिमिटेडने स्फोटांची तीव्रता कमी करणे आणि शासन किंवा एनएमआयएने इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करावे अशा प्रकारच्या मागण्या पोस्टरच्या माध्यमातून करण्यात आल्या .“आम्ही विमानतळाच्या अजिबात विरोधात नाही, पण कठीण खडकाळ डोंगरांच्या स्फोटांचा आम्हाला अतिशय त्रास होत आहे,” असे मत बेलापूर येथील अरेंजा को-ऑप हाउसिंग सोसायटीचे रहिवासी रोहित अग्रवाल यांनी व्यक्त केले .
“आमच्या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात राज्य विमान वाहतूक आणि शहरी विकास विभागांना हस्तक्षेप करण्याचे निर्देश दिले होते. स्फोटांचा परिणाम झालेल्या इमारतींचे संरचनात्मक ऑडिट करावे, अशी आमची मगाणी आहे. असे मत नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी व्यक्त केले.