उरण : शहरालगत असलेल्या ऐतिहासिक द्रोणागिरी किल्ल्यावर रविवारी येथील पाण्याच्या हौदाची सफाई सुरू असताना मानवी सांगाडा आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये डोंगरावरील हौदाची साफसफाई सुरु होती त्यावेळी मृतदेहाचे डोके (कवटी) आणि हाडे आढळून आली आहेत. याचा उरण पोलीस तपास करीत आहेत.
उरणच्या पश्चिम किनारपट्टीलगत असलेल्या द्रोणागिरी पर्वत हे कोरोना काळापासून स्थानिक रहिवाशांचे आकर्षण बनले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अनेक रहिवासी हे किल्ल्यावर पर्यटन आणि ट्रेकिंगसाठी जात आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून या किल्ल्यावर असलेले पाण्याचे हौद हे रिकामे झाले आहेत. यामुळे, रविवारी सकाळी दुर्गप्रेमी कडून हौदाची साफसफाई करण्याचे काम करण्यात येत होते.
याचदरम्यान सुमारे १० ते १२ फूट खोल असलेल्या या हौदामध्ये एका कोपऱ्यात मानवी शरीराच्या सांगाडय़ाचे अवशेष दिसून आल्याने पोलीसांना पाचारण करण्यात आले होते. यावेळी, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याठिकाणी डोकं आणि हाडे आढळून आली आहेत. दरम्यान, किल्ल्यावरील हौदात आढळून आलेल्या या मानवी सांगाडय़ामुळे त्याचे ओळख पटविणे गरजेचे असून ही हत्या आहे की अपघात यासंदर्भात तपास करण्याचे आवाहन पोलीसांसमोर उभे राहीले आहे. या सांगाडय़ाचे नमुने हे फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येणार आहेत.