पत्नीकडे पैशांचा तगादा लावणे,मुलगाच झाला पाहिजे म्हणून छळ करणे या प्रकरणी पीडितेच्या पतीला एक वर्ष सहा महिने कारावास आणि दहा हजाराचा दंड व दंड न भरल्यास आठ दिवसांचा कारावास अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदर खटला नवी मुंबई न्यायालयात सुरु होता.  या प्रकरणात जयश्री सूचक, हर्षद सूचक प्रीती ठक्कर, आणि चिराग ठक्कर यांच्या विरोधात छळ करणे, मारहाण करणे, स्त्रीधन अपहार प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र त्यात चिराग याला शिक्षा ठोठावण्यात आली तर अन्य आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यातील फिर्यादी या चिराग यांच्या पत्नी असून त्यांचा विविह २०११ मध्ये झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> नवी मुंबईतील अनधिकृत ‘द ऑर्चिड’ शाळेचा मैदानावरही ताबा

सुरवातीचे दिवस चांगले गेल्या नंतर व्यवसायासाठी चिराग यांने पत्नीकडे वारंवार पैशांचा तगादा लावला होता. या शिवाय सुरक्षेच्या कारणांनी फिर्यादी यांचे स्त्रीधन सासरच्या लोकांनी काढून घेतले होते. या घटना ०७ मार्च २०११ ते २३ मे २०१८ दरम्यान घडल्या. याच दरम्यान फिर्यादी यांना मुलगी झाली. त्यामुळे घरातील वातावरण अजूनच बिघडले. चिराग यांना मुलगा हवा होता. मात्र फिर्यादी यांना दुसरे अपत्य ठेवणे जीवाला धोका आहे असे वैद्यकीय तपासणीत समोर आले होते. तरीही त्यांना याच वरून मानसिक त्रास देणे सुरु होते. या बाबत गुन्हा नोंद झाल्यावर सदर खटल्याची अंतिम सुनावणी गुरुवारी झाली असून चिराग याला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सदर खटल्याची सुनावणी विकास बडे यांच्या कोर्टात झाली असून सरकारी पक्षातर्फे अरुण फाटके यांनी काम पाहिले. तर कोर्ट कारकून म्हणून पोलीस नाईक धीरज सूर्यवंशी आणि प्रज्ञेश कोठेकर यांनी काम पहिले. या शिवाय वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या मार्गदर्शखाली गुन्ह्याचे तपासाधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सरिता मुसळे यांनी काम केले. 

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband get 1 year and 6 months imprisonment fine rs 10000 over wife harassment zws