नवी मुंबई : बुद्धिबळ हा एका अर्थाने राजकारणी लोकांचा खेळ आहे. राजकारणामध्ये श्रेष्ठ असला तरी या बुद्धिबळाच्या खेळामध्ये राणीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राणी सर्व घर फिरू शकते. बुद्धिबळाच्या खेळात जसं राणीला महत्त्व आहे तशी बेलापूर मतदारसंघाची राणी मीच आहे. इथे किती उंट घोडे आडवे आले तरी त्यांना पाडायची क्षमता माझ्यात आहे, अशी जोरदार टोलेबाजी भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी रविवारी येथे केली.
हेही वाचा – नवी मुंबईतील दि.बा. पाटील नामांतराचा प्रश्न अधांतरीच, स्थानिकांमध्ये चलबिचल वाढली
बेलापूर विधानसभा मतदारसंघात बुद्धिबळ आणि कॅरम स्पर्धांच्या शुभारंभ प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे यांनी जोरदार टोलेबाजी केली. बुद्धीचा विकास करणारा असा बुद्धिबळ खेळ आहे. या खेळाचा वेगळ्या अंगाने अभ्यास केला तर हा राजकारणी लोकांचाही खेळ आहे. राजकारणामध्ये राजा जरी श्रेष्ठ असला तरी बुद्धिबळात राणीला महत्त्व आहे. राणी ही सर्व घर फिरू शकते. आडवी तिरकी उभी असा संचार तिला करता येतो. मात्र राजाला या खेळात मर्यादा आहे. त्याला एकच पाऊल चालता येतं. या खेळात उंटाला घोड्यांना अगदी प्यादांना जेवढा अधिकार आहेत तेवढाही अधिकार राज्याला नाही. म्हणून या घराची श्रेष्ठ कोण आहे तर ती राणी आहे. अशाच प्रकारे बेलापूर मतदारसंघाची राणी मी आहे. तिला किती उंट घोडे आडवे आले त्यांना पाडायची क्षमता माझी आहे, अशा शब्दात मंदा म्हात्रे यांनी राजकीय विरोधकांना टोले लागवले.