नवी मुंबई: मुंबई कृषी फळबाजारातील व्यापारी प्रमोद पाटे यांच्यावर पैशांच्या वादातून ८ ते १० जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता. याबाबत पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे . परंतु त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. त्यामुळे सोमवारी व्यापाऱ्यांनी व्यापार बंद ठेवून सभा घेऊन, मोर्चा काढून हल्याचा निषेध व्यक्त केला आहे.
पोलिसांनी शनिवारपर्यंत हल्लेखोरांना अटक केली नाही ,तर सोमवारी फळबाजार बंद ठेवून आंदोलन करण्यात येणार असून पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आलेला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी फळ बाजारातील व्यापारी प्रमोद पाटे यांच्यावर पैशांच्या वादातून प्राणघातक हल्ला करण्यात आलेला होता . ८ ते १० जणांच्या टोळीने एपीएमसी बाजारातील त्यांच्या कार्यालयात धुडगूस घालून व्यापाऱ्याला मारहाण करून कार्यालयाची तोडफोड केली होती.
संबंधित आरोपींवर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. परंतु अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे याच्या निषेधार्थ फळ बाजारातील व्यापारी ,माथाडी तसेच फ्रुट असोसिएशन यांनी सहभाग घेऊन , मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला. यादरम्यान फळ व्यापाऱ्यांनी पोलिसांना ५ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून शनिवार पर्यंत आरोपींना अटक केली नाही , तर सोमवारी फळ बाजार बंद ठेवून आंदोलन करण्यात येईल ,असा इशारा एपीएमसी फळ बाजार संघ आणि संचालक संजय पानसरे यांनी दिला आहे.