लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : नवी मुंबई, मुंबईसह विविध मोठ्या महानगरांना बेकायदा फेरीवाल्यांची समस्या भेडसावत असताना आत चक्क नवी मुंबईतील महामार्गावरच फेरीवाल्यांनी ठाण मांडल्याचे चित्र आहे. या फेरीवाल्यांमुळे अपघाताचीही शक्यता निर्माण झाली आहे.

नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या शीव पनवेल महामार्ग परिसरातील नेरुळ, जुईनगर,खारघर, कामोठे परिसरातील शीव पनवेल महामार्गावर फेरीवाले दिसतात. आता वाशी उड्डाणपुलाच्या पलीकडे जुन्या जकात नाक्यासमोरच महामार्गावर फेरीवाल्यांनी ठाण मांडले आहे. याबाबत वाहतूक पोलीस व स्थानिक प्रशासनाने योग्य ती कारवाई करण्याची मागणी वाहन चालकांकडून करण्यात येत आहे.

पनवेल ते नवी मुंबई परिसरातील लाखो नागरिक कामानिमित्त मुबंईला महामार्गाने जातात. आधीच महामार्गावर असलेली सततची वाहतूककोंडी असताना त्यात मानखुर्द चेकनाका परिसरातील मुंबई व पुणेकडे दोन्ही दिशेला फेरीवाल्यांनी भर घातली आहे. पदपथाबरोबरच चक्क रस्त्यावरच विक्रीचे सामान ठेवले जाते. त्यामुळे वेगवान असलेल्या या महामार्गावर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

जकातनाका परिसरात फेरीवाले रस्त्यावरच सामान मांडून विक्री करतात. पालिकेने याबाबत तात्काळ कारवाई करण्याची आवश्यकता आहे. याबाबत महापालिकेला फेरीवाल्यांबाबत कल्पना देण्यात आली आहे. -मंगेश शिंदे, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक,मानखुर्द