देशात स्वच्छ शहराच्या यादीत मागील अनेक वर्ष वरचे स्थान प्राप्त करण्याचा नावलौकीक मिळवलेल्या नवी मुंबई शहरात होऊ घातलेल विमानतळ , शिवडी नाव्हाशेवा सागरी मार्ग,तसेच वाढती जलवाहतूक , विस्तारत असलेली रेल्वेसेवा यामुळे झपाट्याने विकसित झालेल्या व तसेच आगामी काळात मोठी मागणी असलेल्या महामुंबई परिसरात जागांचे दर कोट्यावधींची उड्डाणे घेत आहे. याच शहरात एकीकडे १०० मीटरच्या मोक्याच्या भूखंडांचे भाव गगणाला भिडले असून शहरात नवी मुंबई महापालिका व शहरांची निर्मिती करणाऱ्या सिडकोचे दुर्लक्ष झाले असल्याचे पाहायला मिळत आहे.शहरातील अत्यंत मोक्याच्या उच्च विद्युत वाहिन्यांखालील जागांवर मनमानीपणे कारभार सुरु असून नर्सरींच्या आडून बेकायदा बांधकामांचे चांगभले सुरु असल्याचे चित्र आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> उरण : भाद्रपदात श्रावण सरीचा अनुभव

नर्सरींसाठींच्या जागांमध्ये मनमानी अतिक्रमणे बोकाळली असून बळकावेल त्याची जागा जणू असाच काहीसा प्रकार सुरु आहे. सिडकोने अनेक वर्षापूर्वी या जागा नर्सरींसाठी भाडेतत्वावर दिल्या होत्या.त्यांच्या मुदती कालबाह्य झाल्या.या शहरातील नर्सरीबाबत सिडको व शासनदरबारी निर्णयाचा झुलता मनोरा झाला असून आता याच जागांवर बेकायदा कामे वेगात सुरु आहेत. त्यामुळे नर्सरींच्या आडून बेकायदा कारभाराचे चांगभले सुरु आहे.
नवी मुंबई शहरात सिडकोने नवी ह्या जागावर अतिक्रमणे वाढू नयेत म्हणून दिल्या आहेत. ह्या सर्व जागा टाटा पॉवरच्या उच्च दाब वहिनी खालील आहेत. त्यांचा भाडेपट्टा करार संपलेला आहे अतिक्रमण होऊ नयेत म्हणून दिलेल्या जगावरच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालं आहे सिडकोच्या १४ नोडमध्ये ह्या जागा आहेत. मुंबई हे सुनियोजित शहर वसवले असले तरी शहरांचे शिल्पकार असलेल्या सिडकोने नर्सरींच्या जागांच शिल्प मात्र दुर्लक्षित केल्यामुळेच आज या नर्सरींच्या जागांवर रात्रीच्या पार्ट्या झाडल्या जात आहेत. तर अनेकजन बेकायदेशीरपणे या जागांचे भाडे उकळतानाचे चित्र आहे.
नवी मुंबई शहरात असलेल्या नर्सरींच्या जागांचा प्रश्न अत्यंत महत्वाचा असून अशा नर्सरींच्या ठिकाणी मनमानी बेकायदा बांधकाम करण्यात आली आहेत. तर काहींनी या जागा बळकावून आमच्याच जागा असल्याचा तोरा मिरवताना दिसत आहेत. रात्रीच्या अंधारात या नर्सरींमध्ये मैफिलींची फुले उधळली जात आहेत. तर अनेकांनी जागा दुसऱ्यांना पोटभाड्याने दिल्या आहेत.मुळातच या नर्सरींच्या जागी अतिक्रमणे होऊ नये व शहरातील हिरवळ टिकावी ,वाढावी यासाठी दिलेल्या असून अतिशय माफक दरात सिडकोने या जागा नर्सरींसाठी दिल्या होत्या. आज याच जागांच्या गैरवापरातून लाखोंचे भाडे बेकायदेशीरपणे उकळण्याचे प्रकार सुरु आहेत .राजकीय वरदहस्त असलेल्या नर्सरींमध्ये तर राजकीय मैफिलींची रास रंगत असल्याचे चित्र आहे. सिडकोकडून देण्यात आलेल्या नर्सरींच गुऱ्हाळ अजूनही लालफितीत असून अनेक राजकीय वरदहस्ताने नर्सरींच चांगभल जोरात सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे.नेरुळ, सीवूड्स,जुईनगर सह विविध उपनगरात असलेल्या या उच्चविद्युत वाहिन्यांच्या नर्सरींचा प्रश्न आगामी काळात अधिक रंगतदार होणार आहे. यातील अनेक नर्सरींनी मनमानीपध्दतीने नळजोडण्या घेतल्या आहेत.तर अनेकांनी या नर्सरींच्या ठिकाणी गॅरेज तर अनेकांनी पार्टी करण्याचे ठिकाण बनवले आहे. या ठिकाणी असेलल्या नळजोडण्यांचा शोध पालिका अधिकारी कधी घेणार असा प्रश्न आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : मनपा पाठोपाठ पोलीस आयुक्तालय क्षेत्र वाढ ?

सीवूड्स येथील एका नर्सरींमध्ये तर एका मंडप डेकोरेटरने आपले सामान ठेवण्याचे गोडाऊनच बनवले आहे. तर मनमानीपध्दतीने बांधकाम केले जात असून प्रवेशद्वारावर मात्र सिडकोकडून नर्सरींसाठी जागा मिळालेल्या संस्थेचे नाव आहे.या ठिकाणी नुकतीच १० सप्टेंबरला पार्टीं रंगली होती. त्याठिकाणी जॉनी रावत या हास्यकलाकाराचे पोस्टरही येथे लागलेले आहे.त्यामुळे शहरातील या नर्सरी खरच नर्सरी म्हणून शिल्लक आहेत की रंगारंग कार्यक्रमांचे ठिकाण झाले आहे असा प्रश्न पडत आहे. काही ठिकाणी नर्सरींंचे काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. पण एका संस्थेच्या नावावर नर्सरींसाठी जागा तात्पुरत्या स्वरुपात मिळाली होती आज तिथे अनेकांनी जागा बळकावल्याचे चित्र आहे. त्यामुळे सिडको व पालिका आस्थापनांनी याबाबत ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे.अन्यथा नर्सरींच्या नावाने हिरव्या पानांचा बहर येण्याऐवजी हिरव्या नोटांचा मनमौजा धांगडधिंगा असाच वाढत जाणार असे चित्र शहरातील सिडकोकालिन नर्सरींमध्ये पाहायला मिळत आहे. नर्सरींच्या जागी पक्की बांधकामे झाली असून या ठिकाणी पानवनस्पती तसेच फिशरी बनवण्याचेही प्रकार सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. सीवूड्स मध्ये नर्सरींमध्ये रंगलेल्या एका कार्यक्रमासाठी तर दारु, चकना,रोकडा ,खाना असा बॅनर लावून त्यावर स्पॉनर्स यांच्यानावासह बॅनर लावलेला आहे.त्यामुळे शहरातील कोट्यावधींच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जागांचा मनमानी वापर संबंधित प्रशासनाने थांबवणे आवश्यक आहे.

अशा नर्सरींच्या जागा पालिका वाहनतळासाठी मागत आहे. पालिकेच्या विकास आराखड्याबाबत कार्यवाही सुरू असताना या नर्सरींच्या जागांचा आराखडा व विनियोग नीट करण्यासाठी अशा जागांवरील बेकायदा प्रकार बंद करुन योग्य ती कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे.

हेही वाचा >>> उरण : करंजा ते रेवस रो-रो सेवेची प्रतिक्षा कायम ; रेवस जेट्टी रखडल्याने प्रतिक्षा

नर्सरींच्या जागा बनल्यात रात्रीच्या पार्ट्यांची हक्काची ठिकाणे…..
शहरातील अशा नर्सरींच्या अनेक जागा या रात्रीच्या पार्ट्यांची ठिकाणे बनली असून ……..त्यामध्ये काय ती नर्सरी …..काय ती पार्टी…. असा रंग दिवसेंदिवस वाढत चालला असून निवडणुकांच्या काळात तर ही ठिकाणे श्रमपरिहाराची ठिकाणे बनण्याची चिन्ह आहे.
सिडको व पालिका या दोघांनीही या जागांची एकदा प्रत्यक्ष जाऊन या जागा नर्सरींसाठी दिल्या होत्या. आणि आता तिथे काय काय चालू आहे याचे याची देही याची डोळा अनुभव घ्यावा म्हणजे नर्सरींच्या नावाखाली कशा जागा बळकावण्याचा प्रकार सुरु आहे याची प्रचिती येईल.

सीवूड्स येथील नर्सरीसाठी अगदी सुरवातीपासून जागा दिली आहे. परंतू नर्सरीसाठी जागा मागून त्या ठिकाणी डेकोरेशनचे सामान ठेवले जात असेल तर चुकीचे असून हा प्रकार संबंधित व्यक्तिने बंद केला पाहीजे. तर सिडको व शासनाने आम्हाला योग्य त्या पद्तीने नर्सरींसाठी जागा दिली पाहीजे.- गजआनन म्हात्रे, अध्यक्ष, भूमिपुत्र सामाजिक प्रतिष्ठाण,नवी मुंबई

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Illegal operation under the guise of nursery under high power line in navi mumbai amy