नवी मुंबई : सीवूड्स पश्चिमेला बेकायदा पार्किंग सुरू असून कार खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदाराकडून रस्त्यावरच हवे तिथे पार्किंग केल्यामुळे वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यामुळे या व्यावसायिकावर कारवाई कधी हेणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

सीवूड्स सेक्टर ४२ परिसरात पाल कार खरेदी आणि विक्री दुकान असून या दुकानदाराच्या खरेदी व विक्रीसाठी असलेल्या चारचाकी गाड्या रस्त्यावरच हव्या तिथे बेकायदा पार्क केलेल्या असतात. या बेकायदा पार्किंगमुळे अंतर्गत रस्त्यावर पार्किंगचा खोळंबा होत असून नवी मुंबई महापालिकेची कचरा वाहतूक करणाऱ्या गाडीलाही या परिसरातून जाताना अडचण होते. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यावर दुतर्फा पार्किंग केल्यामुळे नागरिक तसेच विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांनी चालायचे कूठून असा प्रश्न निर्माण होतो.

या कार खरेदी विक्री करणाऱ्या दुकानदाराच्या गाड्या सीवूड्स पूर्व पश्चिम जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या लगतच बेकायदा पार्क केलेल्या पाहायला मिळतात. विशेष म्हणजे या सीवूड्स उड्डाणपुलाच्या खालीच सीवूड्स वाहतूक पोलीस चौकी आहे. परंतु वाहतूक पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याची तक्रार स्थानिक नागरिक करत आहेत.

सीवूड्स सेक्टर ४२ परिसरात पाल कार खरेदी-विक्री दुकान असून त्यांच्या गाड्या रस्त्यावरच पार्क केल्या जातात. रस्त्यात दुतर्फा गाड्या पार्क केल्यावर नागरिकांनी चालायचे कुठून असा प्रश्न आहे. वाहतूक विभागाने व पालिकेने कारवाई करावी. ललित पाठक, अध्यक्ष, कुसुमाग्रज वाचनालय, सीवूड्स

रस्त्यावरच बेकायदा वाहने उभी केली जात असतील तर वाहनावर तसेच संबंधित व्यावसायिकावर कारवाई करण्यात येईल. – मोहिनी लोखंडे, वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, सीवूड्स

Story img Loader