लोकसत्ता टीम
उरण: येथील गव्हाण फाटा – दिघोडे ते चिर्ले मार्गावरील अनधिकृत गोदामामुळे व रस्त्यात बेकायदा जड कंटेनर वाहने उभी केल्याने प्रचंड गर्दी होत आहे. या मार्गावरील सातत्याने होणाऱ्या कोंडीचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवासी, दुचाकी वाहनचालक यांना बसत आहे. त्याचप्रमाणे अपघाताचाही सामना करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणातील जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरावस्थाही झाली आहे. त्यामुळे रस्त्यातील खड्ड्याचा त्रास नागरीकांना सहन करावा लागत आहे.
उरण मधून मुंबई, नवीमुंबई, ठाणे, पनवेल शहराकडे येण्या जाण्यासाठी गव्हाण फाटा – दिघोडे – चिर्ले या रस्त्याचा वापर नागरीकांकडून केला जातो. मात्र मागील तीन वर्षापासून या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात अनधिकृत कंटेनर यार्ड सह व्यवसायिकांनी आपले बस्तान बसविले आहे. रस्त्यालगत वाढणाऱ्या अतिक्रमणामुळे येथील नागरीकांना बेशिस्त कंटेनर वाहतूकीचा त्रास सहन करावा लागत आहे.
हेही वाचा… अमळनेरमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक; संचारबंदी लागू
रस्त्यावर होणाऱ्या सततच्या वाहतूक कोंडीमुळे येथील अनेक नोकरदारांना वेळेवर पोहोचता न आल्याने आपल्या उदरनिर्वाहाचे साधन असलेला रोजगार गमवावा लागला आहे. तसेच या मार्गाने रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना वेळेवर उपचार न मिळत नाहीत त्यामुळे या विभागातील अनधिकृत गोदामावर व बेकायदा वाहनांवर कारवाई करण्याची मागणी उरण तालुका मनसे अध्यक्ष सत्यवान भगत यांनी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांच्याकडे केली आहे.