देवनारमध्ये विक्री; पालिकेची कारवाई निष्प्रभ
राज्यातील आघाडीचे स्वच्छ शहर ठरलेल्या नवी मुंबईत उघडय़ावर टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यात वराहांची पिल्ले सोडून बेकायदा वराहपालन सुरू आहे. हे वराह मोठे झाल्यावर ते देवनार येथील कत्तलखान्यांत विकले जात आहेत. वाशीतील रघुलीला मॉल परिसरातील उच्च दाब विद्युत वाहिन्यांखालील मोकळ्या भूखंडावर हे वराह पालन सुरू आहे.
लोकसत्ताने ‘मॉलचा कचरा मॉलच्या दारात’ या वृत्तातून वाशीतील रघुलीला मॉलमधील कचरा जवळच्या भूखंडावर टाकण्यात येत असल्याचे वास्तव मांडले होते. पालिकेने हा कचरा शुक्रवारी मॉलच्या प्रवेशद्वारी टाकला आणि मॉल व्यवस्थापनास वर्गीकरण करण्यास भाग पाडले. मात्र रविवारीही मोकळ्या भूखंडावर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात आला होता. या कचऱ्याच्या ढिगांवर वराहाची पिल्ले सोडून वाढवली जात आहेत. वराहपालनासाठी परवाना मिळवावा लागतो. त्यासाठीच्या सर्व अटींची पूर्तता करावी लागते. वराहांच्या निवाऱ्याचीही सोय करावी लागते. परंतु रबाळे, दिघा, पटनी, वाशी परिसरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा वराहपालन होत आहे. वाशी रेल्वे स्थानक परिसरात अशा डुकरांची संख्या मोठी आहे. उघडय़ावरील कचरा व घाण खाऊन मोठे होताच त्यांची धरपकड केली जाते आणि त्यांना पोत्यात घालून मानखुर्द, देवनार परिसरात विकले जाते.
याबाबत वाशी परिसरातील वराह पकडणाऱ्यांना विचारले असता ते काही बोलण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे पालिकेचा पशुवैद्यकीय विभाग काय करतो असा प्रश्न विचारण्यात येत आहे. पालिकेने याबाबत पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल केले आहेत. पालिकेकडूनही शहरातील वराह पकडण्यात येतात परंतु ही कारवाई तोकडी पडत आहे. तर दुसरीकडे बेकायदा वराहपालन करणारे कारवाईत अडथळा आणत आहेत. कर्मचाऱ्यांना धमकावण्यात येत असल्याची आणि मारहाणही केली जात असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
रघुलीला मॉलने कचरा वर्गीकरणाबाबत तात्काळ कार्यवाही न केल्यास मॉलमधील हॉटेलचा व खाद्यपदार्थ विक्रीचा परवानाच रद्द करण्यात येणार असून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. उघडय़ावर कचरा टाकणे बंद झाल्यास त्यावर अवलंबून असणारे बेकायदा वराहपालन आपोआपच नियंत्रणात येऊ शकेल. वराहपालनामुळे शहराचे स्वच्छता मानांकन घसरण्याची भीती नवी मुंबईकरांना आहे.
नवी मुंबईतील बेकायदा वराहपालन व बेकायदा वराह विक्रीबाबत पालिकेने काही जणांवर गुन्हेही दाखल केले आहेत. पालिका असे वराह देवनारला नेते. बेकायदा व्यवसाय करणारे पालिकेच्या कारवाईला विरोध करतात. त्यामुळे पोलिसांची सुरक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. या बेकायदा व्यवसायामुळे शहर स्वच्छतेलाही बाधा निर्माण होते. पालिका वारंवार कारवाई करत आहे.
– डॉ. वैभव झुंजारे, पशुवैद्यकीय अधिकारी, नमुंमपा
कोणत्याही प्राण्याचा बेकायदा व्यवसाय करणे चुकीचे आहे. असे करणाऱ्यांवर पालिकेने कडक कारवाई करावी. अशा व्यवसायांमुळे प्राण्यांना इजा होते. याबाबत पालिका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही विचारणा करण्यात येईल.
– शकुंतला मुजुमदार, अध्यक्ष, प्राणी क्लेश प्रतिबंध संस्था, ठाणे</strong>
४००० शहरातील वराह
१०१ वर्षभरात पकडलेले वराह