मूळ गावठाणांना वेढा; एमआयडीसी, झोपडपट्टी भागांतही बेकायदा व्यवसाय
स्वच्छ सर्वेक्षण अभियानासाठी नवी मुंबईचा प्रत्येक कोपरा स्वच्छ केला जात असताना मूळ गावठाणांभोवती, झोपडपट्टी परिसरात आणि एमआयडीसी क्षेत्रात असलेल्या भंगारवाल्यांकडे मात्र डोळेझाक केली जात आहे. बेकायदा भंगारसाठय़ांमुळे शहराच्या स्वच्छता आणि सौंदर्याला तर गालबोट लागत आहेच, शिवाय त्यामुळे गुन्हेगारी आणि सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या भंगारवाल्यांना पालिका, एमआयडीसी, सिडको, पोलीस, लोकप्रतिनिधींनी अभय दिले आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी मुंबईत २९ मूळ गावठाणे आहेत. सुनियोजित शहर म्हणून मिरवताना या गावांच्या नियोजनाचा सिडको आणि पालिकेला विसर पडला आहे. याच मूळ गावठाणांच्या भोवती असलेल्या मोकळ्या जागांवर वर्षांनुवर्षे बेकायदा भंगारवाल्यांनी बस्तान बसवले आहे. तुर्भे, दिघा, यादवनगर, बोनसरी, इंदिरानगर, तुर्भे स्टोअर या झोपडपट्टी भागांत अनेक ठिकाणी बेकायदा भंगारवाल्यांनी हातपाय पसरले आहेत. आग्रोळी, दारावेसह नवी मुंबईतील मूळ गावठाणांना भंगारविक्रेत्यांनी वेढा घातला आहे. बोनसरी येथे तर नाल्यातच भराव घालून गोदाम थाटले होते. तिथे चार खोल्या बनवल्या होत्या. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्यावर कारवाई करण्यात आली होती. बोनसरी नाल्यालगतच बेकायदा भंगारची दुकाने थाटण्यात आली आहेत.
महापालिका क्षेत्रात एमआयडीसी परिसरात विविध कंपन्या बंद झाल्यानंतर त्यांच्या जागांवर भंगारवाल्यांनी बस्तान बसवले आहे. ‘एव्हररेडी’ कंपनी बंद झाल्यानंतर तिथे भंगारविक्रेत्यांनी रसायनांचा साठा केला होता. झोपडपट्टीतील मुले तिथे खेळत असताना मोठी आग लागली होती. या भंगार गोदामांमुळे गुन्हेगारीही वाढली आहे. तुर्भे परिसरात भर रस्त्यातच काही ठिकाणी भंगारविक्रेते आहेत. दिघा परिसरात त्यांचे प्रमाण मोठे आहे. गावठाणांच्या बाजूला प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे व स्थानिक लोकप्रतिनीधींच्या कृपाशीर्वादामुळे भंगार विक्रेते बिनदिक्कत व्यवसाय करत आहेत, असे रहिवाशांचे म्हणणे आहे. या भंगारसाठय़ांमुळे गावांभोवती भुरटय़ा चोऱ्या वाढत आहेत. या संदर्भात पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरिश पटनिगिरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बेकायदा भंगार गोदामांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
बेकायदा भंगारविक्रेत्यांवर कारवाई करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला आहेत. त्यासाठी पोलीस विभागामार्फत कायमस्वरूपी अतिक्रमण कारवाईसाठी बंदोबस्त दिला आहे. भंगारविक्रेत्यांमुळे होणाऱ्या गुन्हेगारीबाबत आमच्याकडे असलेल्या माहितीनुसार कडक कारवाई करण्यात येईल.
– सुधाकर पाठारे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ १
बोनसरी, तुर्भे परिसरात नाल्याच्या बाजूलाच बेकायदा भंगारविक्रेते आहेत. बंद पडलेल्या कंपन्यांच्या जागा अडवून रसायनांचा साठा केला जात आहे. मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीस व पालिका प्रशासनाने बेकायदा भंगार विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी.
– महेश कोटीवाले, शाखाप्रमुख
बेकायदा भंगारविक्रेत्यांमुळे शहर स्वच्छतेत अडथळा येत आहे. प्रशासनाकडे याबाबत तक्रारी केल्या तर कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराचे नाव त्या भंगारविक्रेत्यांना सांगितले जाते. दिघा, यादवनगर परिसराची भंगारविक्रेत्यांनी काय अवस्था केली आहे, याची प्रशासनाने पाहणी करावी.
– रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर