मुंढे यांची बदली होताच बेकायदा बांधकामांना जोर

तुकाराम मुंढे यांची बदली होताच यादव नगरची अवस्था पुन्हा जैसे थे झाली आहे. तिथे पुन्हा अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहिल्या आहेत. अतिक्रमणविरोधी पथकानेदेखील आता या झोपडय़ांकडे पाठ फिरवली आहे. तुकाराम मुंढे यांनी आयुक्तपदाच्या कारकीर्दीत जानेवारी व फेब्रुवारीत शासकीय भूखंडांवरील २००० नंतरच्या एक हजारापेक्षा अधिक झोपडय़ा जमीनदोस्त केल्या होत्या.

यादव नगरमध्ये तुकाराम मुंढे यांनी जानेवारीत ‘वॉक विथ कमिशनर’ हा उपक्रम राबवला होता. यादव नगरमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदा झोपडय़ा वसल्याचे त्यांच्या निर्दशनास आले होते. त्यानंतर त्यांनी २००० नंतरच्या अनधिकृत झोपडय़ांवर कारवाईचा बडगा उगारला होता. एक महिन्यात हजारपेक्षा अधिक झोपडय़ा जमीनदोस्त केल्या होत्या. या कारवाईमुळे भूमाफियांचे धाबे दणाणले होते. त्यामुळे ते नवीन झोपडय़ा बांधण्यास धजावत नव्हते. अनधिकृत झोपडय़ांवरील कारवाईविरोधात यादव नगरमध्ये रस्ता रोकोदेखील करण्यात आला होता. तर माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चालादेखील झोपडपट्टीधाकरांनी हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. तर पालिकेच्या सर्वसाधरण सभांमध्येदेखील झोपडपट्टय़ांवरील कारवाईविरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला होता. तरीही नियमांवर बोट ठेवत तुकाराम मुंढे यांनी अनाधिकृत झोपडय़ांवरील कारवाई सुरूच ठेवली होती. पण तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यामुळे पुन्हा यादव नगरमधील झोपडय़ा जैसे थे झाल्या आहेत.

एमआयडीसीच्या भूखंडावरील हजारो अनधिकृत झोपडय़ा पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केल्या आहेत. ज्या भूखंडांवरील झोपडय़ा हटवण्यात आल्या आहे. तिथे कुंपण घालण्यात यावे किंवा त्या भूखंडांची विक्री करण्यात यावी, असे पत्र पालिकेच्या वतीने एमआयडीसीला देण्यात आले आहे. पुन्हा अतिक्रमण झाले असल्यास पालिका कारवाई करेल.

अमरीश पटनिगिरी, अतिक्रमण उपआयुक्त