नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या सीवूड्स येथील मलनि:सारण केंद्रालाही बेकायदा झोपड्यांचा गराडा पडल्याचे चित्र आहे. पालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. नवी मुंबई शहरात बेकायदा बांधकामांचा प्रश्न मोठा असून विविध विभागात तसेच विविध मोकळ्या जागा, पालिकेच्या वास्तूंच्या अवतीभोवती असलेल्या मोकळ्या जागेत अनधिकृत बेकायदा झोपड्यांची संख्या वाढली आहे.
शहरात बेलापूर ते दिघ्यापर्यंत बेकायदा झोपड्यांची संख्या वाढतच असून पालिकेने याबाबत कडक कारवाई करणे आवश्यक आहे. नवी मुंबई शहरात एकीकडे बेकायदा इमारतींच्या बांधकामांकडे दुर्लक्ष होते तसेच जागा मिळेल तिथे जागा अडवून हवे त्या ठिकाणी वास्तव्य करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सीवूड्स सेक्टर २५ येथे महापालिकेचे मलनि:सारण उदंचन केंद्र आहे. या केंद्राच्या सभोवताली बेकायदा झोपड्यांचा गराडा पडला असून दिवसेंदिवस ही संख्या वाढतच चालली आहे.
हेही वाचा…जेएनपीएमध्ये शेतकऱ्यांच्या निर्यात कृषीमालासाठी केंद्र उभारणार
या परिसरात बेकायदा झोपड्यांची संख्या वाढत असून रेल्वे मार्गाच्या दिशेने त्यांची चढाई सुरु आहे. याच बेकायदा झोपड्यांच्या ठिकाणी वीजबत्तीही सुरु होते. त्यामुळे या बेकायदा झोपड्यांना वीजपुरवठा कुठून मिळतो. तसेच या नागरीकांना पाण्याचा पुरवठा कोठून होतो असा प्रश्न निर्माण झाला आहे. याठिकाणी वास्तव्यास असलेल्या महिलांना मुलांना तसेच इतर नागरीकांना विचारले असता. आम्ही, युपी, बिहार, उडीसा, आंध्रा या भागातून आलो असून आमचे हातावर पोट असून आम्ही जागा मिळेल तेथे राहतो. वीजपुरवठा कसा तसेच पाणी कुठून मिळते याबाबत विचारणा केली असता काहीही सांगण्यास नकार दिला.
पालिकेच्या मलनि:सारण केंद्राच्या पाठीमागील बाजुस भिंतीला एक छिद्र केले असून त्या ठिकाणी प्लास्टिकचा पाईप आतील बाजुला पडला असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे पालिकेच्या या केंद्रातून या झोपड्यांना पाणीपुरवठा होतो का असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या केंद्रालगतच्या भिंतींचा आधार घेत अनेक बेकायदा झोपड्या बनत असताना पालिकेने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
हेही वाचा…विरार-अलिबाग बहुउद्देशिय मार्गिकेवरील २८ गावांचे दर अद्याप अनिश्चित
पालिकेच्या मलनि:सारण केंद्राभोवती झालेल्या बेकायदा झोपड्यांबाबत पाहणी करुन लवकरच तोडक कारवाई करण्यात येईल. – शशिकांत तांडेल, सहाय्यक आयुक्त बेलापूर विभाग, नवी मुंबई महापालिका