सीमा भोईर

विकासकामे रखडल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात समाविष्ट गावांची स्थिती ‘ना घर का ना घाट का’ अशी झाली असून, जर सोयीसुविधा द्यायच्या नव्हत्या तर आम्हाला पालिकेत का घेतले, असा सवाल ग्रामस्थ विचारीत आहेत. पालिकेत समाविष्ट होऊनही गावातील घनकचरा व्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा, शाळांचे हस्तांतरण आदी प्रश्नांचे भिजत घोंगडे कायम आहे.

पनवेल महानगरपालिकेत समाविष्ट २९ गावांची स्थिती दिवसागणिक गंभीर बनली आहे. लोकसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींचे उत्पन्न चांगले होते. त्यातून गावांमध्ये विकास कामे होत होती. महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतर या प्रक्रियेला खीळ बसली. गावे भकास दिसू लागली. त्यात गावात नागरीकरण झाले. टोलेजंग इमारती उभ्या राहू लागल्या. मात्र या वाढत्या लोकवस्तीच्या तुलनेत सुविधा नाहीत.

पनवेल महापालिका स्थापन होऊन दोन वर्षे झाली. मात्र गावातील विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याची नागरिकांची भावना आहे. अपुरा पाणीपुरवठा, कागदावर राहिलेले घनकचरा व्यवस्थापन, जिल्हा परिषदेच्या शाळांचे हस्तांतरण रखडले आहे. त्यामुळे शाळांची अवस्था बिकट आहे.

तळोजे, पाचणंद काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, कामोठे, चाळ, नावडे, नावडेखार, पेंधर, तोंडरे, कळंबोली, अंबेतखार, कोल्हेखार, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंभोडे, आसुडगाव, खैरणे बुद्रुक, बीड, आडिवली, रोहिंजन, धानसर, पिसर्वे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजे, मजकूर, घोट, कोयनावेळे ही गावे पालिका क्षेत्रात समाविष्ट आहेत.नक्की ही गावे पालिका क्षेत्रात आहेत की नाहीत हा प्रश्न पडतो.

रस्त्यांच्या दुरुस्तीविषयी निविदा काढल्या असून लवकरच कामाला सुरुवात होईल. इतर कामेही टप्प्याटप्प्याने पूर्ण होतील.

– जमीर लेंगरेकर, उपायुक्त पनवेल महानगरपालिका

गावातील रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट आहे. रस्त्यांच्या कामाच्या निविदा निघाल्या असून लवकरच कामे सुरू होतील. नादुरुस्त जलकुंभांची डागडुजी केली जाणार आहे. शाळा हस्तांतरण समस्या समन्वयातून सुटू शकते.

-ज्ञानेश्वर पाटील, नगरसेवक (प्रभाग क्र. १)

ग्रामपंचायत असताना गावांचे महसुली उत्पन्न चांगले होते. त्यातून रस्ते, पाणी आणि इतर समस्या अगदी सहज सोडविल्या जात.  समाविष्ट झाल्यापासून आश्वासनांव्यतिरिक्त काहीच होत नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.

सूरज गायकर ( रहिवासी)