उत्साह अन् गहिवरही
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.., गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजकार.. या पारंपरिक निनादात श्री गणेशाला रविवारी निरोप देण्यात आला. ढोल-ताशांचा निनाद.. बेन्जो, लेझीम पथके, डीजे, फटक्यांची आतषबाजी अशा जल्लोषात आणि तितक्याच भावपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी गणपतीबाप्पालाआर्जव करण्यात आले.
नवी मुंबईत विसर्जनासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. महापालिका क्षेत्रात रात्री उशिरापर्यंत  ५१९ सार्वजनिक आणि साडेसात हजार घरगुती अशा सुमारे आठ हजारांहून अधिक मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. या वेळी नवी मुंबईतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. गेल्या ११ दिवसांपासून लाडक्या गणरायाची मनोभावे पूजा आराधना केल्यानंतर अनंतचतुर्दशीला मोदक, लाडू, दही-भात अशा शिदोरीसह गणेशाला निरोप देण्यात आला. गणेशविसर्जनासाठी दिघा तलावापासून ते सीबीडीपर्यंतच्या तलवांमध्ये गणरायाचे विसर्जन करण्यात आले. वाशी येथील सागर विहार, ऐरोली जेटी, दिवाळे गाव, सानपाडा जेटी, बामणगवळी घाट, ऐरोली, घणसोली, कोपरखरणे, नेरुळ, रबाले आदी तलावांमध्येही हे विर्सजन करण्यात आले. महापालिकेने गणेशविर्सजनसाठी विशेष व्यवस्था केली होती. सुरक्षा मार्गदर्शक, सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. अग्निशामक दलाचे पथक, आरोग्य व्यवस्था, विद्युत विभाग हेही उशिरापर्यंत कार्यरत होते. पोलिसांचाही खडा पहारा या वेळी पाहण्यास मिळाला.  दरम्यान, तलावांचे सौंदर्य बिघडू नये यासाठी त्यातील निर्माल्य महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते आणि पालिकेच्या आरोग्य विभगाचे कर्मचारी गोळा करीत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Immersion of ganesh idols