पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त निवासातील गणेशमूर्ती गुरुवारी सायंकाळी सव्वासहा वाजता निवासातील प्रांगणात बनविलेल्या कृत्रिम तळ्यामध्ये भक्तीभावाच्या वातावरणात विसर्जित करण्यात आली. खारघर येथे पनवेल महापालिका आयुक्तांचे निवासस्थान आहे. मागील तीन वर्षांपासून आयुक्त गणेश देशमुख यांनी निवासातच गणेशमूर्ती कृत्रिम तळ्यात विसर्जन करण्याची पायंडा सूरु केला आहे. गणेशमूर्ती शाडूची असल्याने चार तासानंतर या गणेशमूर्तीच्या मातीतून निवासस्थानातील बागेसाठी वापरली जाते. त्यानिमित्ताने गणराया आमच्यासोबत वर्षभर राहतात अशी भावना यावेळी आयुक्त देशमुख आणि कुटूंबियांनी व्यक्त केली.
हेही वाचा >>> अबब, चिरनेर मध्ये साडेबारा फुटी अजगर; भल्यामोठ्या अजगरामुळे नागरिकांमध्ये घबराहट
गुरुवारी सायंकाळी खारघर येथील आयुक्त निवासामध्ये आयुक्त देशमुख आणि कुटूंबियांनी भक्तीभावाच्या वातावरणात गणरायाची आरती केली. आरती पार पडल्यानंतर गणेशमुर्तीची मिरवणूक निवासस्थानाच्या परिसरात काढण्यात आली. अवघ्या तीन मिनिटांच्या मिरवणूकीत वाजंत्र्यांचा सहभाग होता. मात्र एक थाप ढोल वाजवणारे आणि एक ड्रम वाजवणारे असे वाजंत्री होते. त्यामुळे मिरवणूकीतील बॅण्डचा आवाज निवासस्थानाबाहेर जाऊ शकला नाही. यावेळी आयुक्तांनीच आवाजाची मर्यादा ओलांडली जाणार नाही याची दक्षता घेतल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यानंतर निवासस्थानाच्या प्रांगणात पाण्याने भरलेला २०० लीटरच्या ड्रमला सजविण्यात आले होते. याच कृत्रिम तलावामध्ये गणेशमूर्तीची विसर्जनापूर्वी आरती करण्यात आली. गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याची साद घालत देशमुख कुटूंबियांनी विसर्जन केले.
हेही वाचा >>> रविवारी नवी मुंबईत २२२ ठिकाणी राबवणार स्वच्छता मोहीम
विसर्जनानंतर कोल्हापूर पद्धतीने कुरमु-यांची उधळण करण्यात आली. पनवेल महापालिका क्षेत्रात आयुक्त देशमुख यांनी यंदा पहिल्यांदा गणेशमूर्ती दानाची संकल्पना अंमलात आणली. शाडूच्या गणेशमूर्ती घरच्या घरी विसर्जन करता येईल, हा पर्याय गणेशभक्तांना दिला होता. यावर्षी दीड दिवस आणि गौरी गणपती विसर्जनावेळी २३९ गणेशोत्सव साजरा करणा-या कुटूंबियांनी पालिका प्रशासनाकडे गणेशमूर्ती दान देण्याचा निर्णय घेतला. पालिकेच्या पर्यावरण पूरक गणेशोत्सवाच्या पहिल्याच सादेला नागरिकांचा सुद्धा प्रतिसाद मिळाल्याने पालिका प्रशासनाने संबंधित २३९ कुटूंबियांनी ‘पर्यावरण दूत’ घोषित केले आहे. लवकरच या पर्यावरण दूतांचा गौरव समारंभ पालिका कऱणार आहे.