नवी मुंबई: नवी मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकाम, फेरीवले,मार्जिनल जागेचा वापर करणाऱ्या दुकान धारकांवर कारवाईचा बडगा उगारला होता. परंतु आता ही धडक कारवाई मंदावली असून शहरात ठिकठिकाणी व्यवसायिक व दुकानधारक सर्रास व्यवसाय करण्यासाठी वाढीव जागेचा वापर करीत आहेत.
वाशी एपीएमसी से.१९ येथील बाजार आवारात ही वाढीव जागेचा वापर सुरूच आहे. एकेकाळी वाढीव जागेच्या वापरावर कारवाईचा बडगा उरगला होता, पंरतु आता पालिकेचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. एपीएमसी माथाडी भवन येथील बाजारात आधीच पार्किंगची समस्या उद्भवत आहे. हा बाजार परिसरातील रस्ता हा पाचही बाजाराला जोडला गेला आहे. त्यामुळे याठिकाणी वाहनांची वर्दळ नेहमीच असते. त्यामध्ये रस्त्यावर अनधिकृत पार्किंगचा विळखा असतो, अशातच येथील व्यापारी दुकान धारक आपला बाजार वाढीव जागेत मांडून ठेवत असतात. याठिकाणी विद्युत रोषणाईचे सामान, किराणा बाजार, करकोळ बाजार, असे अनेक प्रकारचे दुकान आहेत.
मात्र ही मंडळी त्यांचे सामान अधिक जागेत पसरवून ठेवून मार्जिनल जागेचा वापर करीत आहेत. रस्त्यालगत पार्किंग व फुटपाथाला लागून व्यापाऱ्यांचे बस्तान यामुळे पादचाऱ्यांना फुटपाथवरुन जाताना त्रास सहन करावा लागत आहे. तत्कालीन आयुक्त यांच्या काळात येथील मार्जिनल जागेच्या वापरावर कारवाई करण्यात आली होती. परंतु आता याठिकाणी पून्हा मार्जिनल जागेचा अमाप वापर सुरूच आहे.