नवी मुंबई : सिडको महामंडळातील कारभारामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी बुधवारी एकाच दिवशी सिडकोतील तब्बल १२८ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध विभागांत बदल्या केल्या. यामध्ये शिपायापासून ते क्षेत्राधिकारी संवर्गात काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिडकोत कर्मचाऱ्यांची त्याच विभागातील मक्तेदारी मोडीत काढून, त्यांना विविध विभागांच्या कामाचा अनुभव मिळण्यासाठी दर तीन वर्षांनी बदल्या केल्या जातात. कार्मिक विभागाच्या व्यवस्थापक प्रमदा बिडवे यांनी केलेल्या बदल्यांची यादी बुधवारी जाहीर केली. या यादीत शिपाई, मुकादम, सफाई कामगार, सहाय्यक विकास क्षेत्राधिकारी, क्षेत्राधिकारी, लिपिक, टंकलेखक, कार्यालयीन सहाय्यक या पदांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली इतर विभागांत करण्यात आली. सिडकोचे अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांना साडेबारा टक्के विभाग, वसाहत विभागातून वसाहत विभाग १, २, ३ या विभागातंच काम करण्याची संधी देण्यात आली आहे. व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी जुनी प्रथा मोडीत काढत अनेक प्रस्थापितांना इतर विभागांत पाठविण्याचे सक्त आदेश होते. मात्र काहींचा अपवाद वगळता साडेबारा टक्के व वसाहत विभागांतच अनेकांचे पुनर्वसन करण्यात आल्याची चर्चा सिडकोत सुरू आहे.

नैना प्रकल्प, पुनर्वसन, सामाजिक सेवा, अनधिकृत बांधकाम विभाग या विभागांमध्ये ‘चिरीमिरी’ मिळत नसल्याने अनेकांनी त्यांच्या बदलीनंतर नाके मुरडली आहेत. सध्या सिडकोमध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या कामगार प्रतिनिधी निवडणुकीची प्रक्रिया सुरू असतानाच निवडणूक आचारसंहितेच्या काळात सिडकोच्या उच्चपदस्थांनी शेकडो सिडको कर्मचाऱ्यांच्या बदल्या करुन नवी प्रथा पाडली. याबाबत सिडको मंडळाच्या जनसंपर्क विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला मात्र प्रतिसाद मिळू शकला नाही.

बदलीपूर्वीच यादी बाहेर

कार्मिक विभागाने बदल्यांची यादी अंतिम करण्यापूर्वी अनेक कर्मचाऱ्यांना त्यांची बदली कोणत्या विभागात काेणत्या कार्यालयात होणार याबाबत मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी त्यांचे सचिवालयातील वजन वापरून बदली प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांनी यादी बदलणार नाही यावर ठाम भूमिका घेतली.

प्रत्येक कर्मचाऱ्यांना सर्वच विभागात काम करण्याची संधी मिळण्यासाठी बदली ही प्रक्रिया विभागाच्या तक्ता प्रमाणे राबविली जाते. हा नियम येथे पाळला गेला नसल्याची कुजबुज सिडकोत सुरू होती.

बदल्यांची यादी अंतिम करण्यापूर्वी गोपनीय यादीची माहिती फुटल्याने कार्मिक विभागाच्या ढिसाळ कारभाराविषयी कर्मचाऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे.