उरण : जेएनपीए बंदर आणि परिसरात ये-जा करणारी हजारो जड कंटेनर वाहने बेदरकारपणे हाकली जात आहेत. गेल्या दोन दिवसांत उरण, जेएनपीए आणि पनवेल येथील महामार्गावर तीन अपघात झाले आहेत. यात जीवितहानी टळली असली तर लहान वाहनांचे नुकसान झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेएनपीए बंदरातून दररोज १५ हजारापेक्षा अधिक जड कंटेनर वाहने उरणच्या जेएनपीए बंदर ते पळस्पे व जेएनपीए ते आम्रमार्ग नवी मुंबई या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करीत आहेत. यातील अनेक वाहने ही बेदरकारपणे वाहतूक करीत आहेत. याचा फटका या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकी व हलक्या वाहनांना बसत आहे. त्यामुळे अनेक वाहनांना या कंटेनर वाहनांकडून धडका दिल्या जात आहेत. त्यात त्यांचे नुकसान होत आहे. या अपघातानंतर जड वाहनांचे चालक व मालकांकडून नुकसानभरपाई न देता उलट दमदाटी केली जात असल्याचे अपघातात नुकसान झालेल्या वाहन मालकांचे म्हणणे आहे.

हेही वाचा…गणेश नाईकांच्या मंत्रिपदामुळे शहराला वाढीव पाण्याची आस, बारवी धरणाचे पाणी मिळण्याची आशा बळावली

जेएनपीए बंदराला जोडणारे दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. या दोन्ही मार्गांवरून मोठ्या प्रमाणात प्रवासी व हलकी वाहने तसेच दुचाकी वाहने प्रवास करीत आहेत. मात्र या जड व लांबीच्या कंटेनर वाहनांचा अंदाज न आल्याने अनेक अपघात या मार्गावर होत आहेत.

सेवामार्ग मोकळे करा

जेएनपीए बंदराला जोडणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गावरील हलक्या व दुचाकी वाहनांना सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता सेवा मार्ग बनविण्यात आले आहेत. मात्र या मार्गावर मोठया प्रमाणात जड कंटेनर वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे हलकी आणि दुचाकी वाहने मुख्य मार्गावरून प्रवास करीत आहेत. परिणामी अपघात होण्याचा धोका वाढत आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवरील सेवा मार्ग मोकळे करण्याची मागणी केली जात आहे.

हेही वाचा…२२ पाणथळ जागांचे भवितव्य अहवालबंद

चालकांना प्रशिक्षण

उरण, पनवेल, न्हावा आदी कंटेनर वाहनांवरील चालकांचे प्रबोधन करून सुरक्षेचे प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. यामुळे अपघात कमी होण्यास मदत होईल अशी माहिती नवी मुंबईचे वाहतूक पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांनी दिली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In last two days three accidents on the highway at uran jnpa and panvel sud 02