उरण : लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असून मावळ लोकसभा मतदारसंघात महत्वाचा असलेल्या शेकापने महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याने बळ मिळणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी उरणच्या सभेत या जागेसाठी उमेदवारी ही घोषित केली आहे. मात्र विधानसभा निवडणुकीत ही शेकाप काय भूमिका घेणार याकडे मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. मावळ हा लोकसभा मतदारसंघ रायगड आणि पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि मावळ मधील आहे. सहा पैकी उरण,पनवेल आणि कर्जत ही तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यातील आहेत. यामध्ये शेतकरी कामगार पक्षाची ताकद दोन मतदारसंघात निर्णायक आहे. हा मतदारसंघ २००९ मध्ये पुनर्गठीत झाला. त्यावेळी शिवसेना, शेकाप आणि भाजप अशी युती होती. विरोधात राष्ट्रवादी होती. त्यानंतर २०१४ मध्ये शिवसेना भाजप युती होती. तर शेकाप स्वतंत्र होती. त्यावेळी शेकापने ही जागा लढविली होती. मात्र २०१९ ला पुन्हा शिवसेना भाजपा युती झाली. आणि राष्ट्रवादी शेकाप आघाडी होती. मात्र तरीही शिवसेने ही लोकसभा जागा शिवसेनेने सलग तिसऱ्यांदा जिंकली आहे. मात्र यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात फूट पडली आहे. विद्यमान खासदार हे शिंदे सेनेत आहेत. ते भाजप बरोबर असल्याने ही जागा भाजपा ला मिळणार की शिंदे सेनेला ही समस्या कायम आहे. तर राष्ट्रवादीत ही दोन गट निर्माण झाल्याने शरद पवार गट,शिवसेना ठाकरे गट आणि शेकाप या तीन प्रमुख पक्षांची आघाडी झाली आहे. यामध्ये शिवसेना ठाकरे गटाला ही जागा देण्यात आली आहे. याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : नवी मुंबई : डिझेल चोरट्यांचा मोर्चा आता रहिवासी वस्तीत, चोरीसाठी चक्क महागड्या गाडीचा वापर

मावळ लोकसभा मतदारसंघात शेकापच्या दोन लाख मतदार आहेत. त्यामुळे ही संख्या निर्णायक आहे. तर सध्याच्या राजकीय फाटफुटीत एक गठ्ठा मते महत्वाची आहेत. उरण आणि पनवेल हे दोन्ही मतदारसंघ हे शेकापची पारंपरिक आहेत. त्यातील अनेकजण भाजप मध्ये सहभागी झाले आहेत. तरीही २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यावर कर्नाळा बँक घोटाळ्यात कारवाई होऊनही ६० हजारा पेक्षा अधिक मते मिळाली होती. त्याचप्रमाणे अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी पक्ष सोडूनही ग्रामपंचायत निवडणूकीत शेकाप आघाडीने बाजी मारली आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरील पक्षाची ताकद टिकून आहे. याचा फायदा हा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला होणार आहे. मात्र २०१९ च्या निवडणूकित भाजपचे अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी विजय संपादीत केला होता. तर शिवसेनेचे मनोहर भोईर हे दुसऱ्या क्रमांकावर होते. आणि शेकाप तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यामुळे महाविकास आघाडीत शेकापची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र विधानसभा निवडणुकीसाठी शेकापच्या भूमिकेची प्रतीक्षा आहे. यामध्ये पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आणि शेकापचे वजनदार नेते जे. एम. म्हात्रे यांचे चिरंजीव प्रीतम म्हात्रे यांच्या कार्यकर्त्यांनी ही उरण विधानसभा लढविण्याची अपेक्षा व्यक्त केल्याची चर्चा सुरू आहे. तर उरण विधानसभा मतदारसंघात पक्षाने संधी दिल्यास आपण ही निवडणूक लढण्यासाठी तयार असल्याचे मत उरण तालुका शेकापचे चिटणीस विकास नाईक यांनी दिली.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In maval lok sabha election shetkari kamgar paksha supports mahavikas aghadi css