संतोष जाधव, लोकसत्ता
नवी मुंबई: संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच नवी मुंबईकरांचे डोळे जून महिन्यात पावसाकडे लागले होते. दिवसेंदिवस शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणीपातळी कमी होत गेली व २३ जूनपर्यंत पाऊस न पडल्याने मोरबे भरणात फक्त ३३ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक होता.
परंतू २४ जूनपासून पावसाला सुरवात झाली व पावसाच्या महिनाभरातील जोरधारेमुळे मोरबे धरणात ३० दिवसात २०८२ मिमी पावसाची नोंद झाली असून पुढील तब्बल ८ महिने पुरेल एवढा म्हणजेच १३ मार्च पर्यंत नवी मुंबईला सुरळीत पाणीपुरवठा करता येईल एवढा पाणीसाठा मोरबे धरणात झाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांची पाणी चिंता मिटली असली तरी आठवड्यातून एक दिवस विभागवार संध्याकाळची पाणीकपात तात्काळ कमी केली जाणार नाही.
जूनच्या अखेरीस पावसाला सुरवात झाली व महिनाभरात धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत पाणीसाठा बरोबरीत आला आहे. परंतू आठवड्यातून एक दिवस विभागवार संध्याकाळची पाणीकपात तात्काळ रद्द करण्यात येणार नाही. – राजेश नार्वेकर,आयुक्त नवी मुंबई महापालिका