नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा आवारातील धोकादायक इमारतीत खाली करण्यासाठी व्यापाऱ्यांचे स्थलांतर करणे महत्त्वाचे आहे,मात्र यासाठीपर्यायी मोठी जागा मिळत नसल्याने अडचणी येत होत्या. मात्र आता कांदा बटाटा बाजारातील व्यापाऱ्यांसाठी बाजार समिती प्रशासनाने पर्यायी जागा शोधली असून कांदा बटाटा आवारातील लिलाव गृह शेजारी व म्याफको मार्केट मागील मोकळ्या जागेत शेड बांधून गाळे तयार करणार आहे. तसेच बाजारातील विंग प्रमाणे व्यापाऱ्यांना त्याठिकाणी स्थलांतर करण्यात येईल अशी माहिती एपीएमसीने दिली आहे.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांदा- बटाटा बाजारातील सिडको निर्मित इमारती वर्षनुवर्षं धोकादायक जाहीर होत आहेत. सन २००५पासून कांदा बटाटा बाजार अतिधोकादायक जाहीर होत असून दर वर्षी पावसाळ्यात मे महिन्यात खाली करण्याच्या नोटीस बजावण्यात येतात. कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास रखडत असून तसेच येथील व्यापाऱ्यांना पुनर्बांधणी दरम्यान पर्यायी जागा उपलब्ध होत नसल्याने स्थलांतर ही करता येत नव्हते, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. लवकरात लवकर कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे, हे सर्वांच्या लक्षात आले असून त्यासाठी बाजार घटकांनी तयारी दर्शवली आहे. व्यापाऱ्यांसाठी एपीएमसी प्रशासनाने पर्यायी जागा पाहिली आहे. बाजार आवारातील लिलाव गृह शेजारी काही तर म्याफको मार्केट मागील मोकळा भुखंड असे दोन ठिकाणी तात्पुरते गाळे उभारले जाणार आहेत. या दोन्ही जागा शेतकरी,ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या सोयीने पहिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या व्यापारी हे पर्यायी जागेत स्थलांतरित होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : दिल्ली-मुंबई १२ तासांचे स्वप्न भंगणार, बडोदा-मुंबई महामार्गाचे काम सरासरी ४५ टक्के पुर्ण परंतू विरार अलिबागचे भूसंपादन अवघे २२ टक्केच

कांदा बटाटा बाजाराचा पुनर्विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. मात्र या पुनर्बांधणी दरम्यान येथील व्यापाऱ्यांना इतर ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी जागेची गरज आहे. शेतकरी,ग्राहक आणि व्यापाऱ्यांना सोयीस्कर जागा हवी होती,ती जागा उपलब्ध झाली असून लिलाव गृह शेजारील व म्याफको मार्केट मागील भूखंड जो लिलाव गृहाला लागूनच आहे अशी जागा निवडली आहे. लवकरच व्यापाऱ्यांसमवेत बैठक घेवून निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने स्थलांतर करण्यात येईल.

पी.एल. खंडागळे, सचिव,एपीएमसी.