नवी मुंबई : नवी मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ संबंधित मोठी कारवाई केली असून सदर कारवाईत १ किलो ४ ग्रॅम वजनाचे तब्बल २ कोटी रुपयांचे एमडी विक्री प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. सलाउद्दीन अलाउद्दीन शेख ( वय २१ वर्ष) आणि फजल जाफर खान( वय २१ वर्ष)  असे अटक आरोपींची नावे असून दोघेही मुंबई माहीम येथे राहणारे आहेत.

शीव पनवेल महामार्गावर वाशी येथे दोन व्यक्ती अंमली पदार्थ त्यांच्या ग्राहकांना देण्यासाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निरज चौधरी यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश धुमाळ, सचिन कोकरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर बनकर, रमेश तायडे, गणेश पवार,पोलीस नाईक  अंकुश म्हात्रे, संजय फुलकर,राकेश आहिरे या पथकाने शीव पनवेल मार्गावर सानपाडा ते वाशी खाडी पूल दरम्यान सापळा लावला.

हेही वाचा…भाजपा कडून देशाच्या लोकशाही आणि संविधानाला धोका कायम, उरणच्या मेळाव्यात आदित्य ठाकरे यांचे प्रतिपादन

खबरीने दिलेली माहिती आणि आरोपींचे केलेल्या वर्णनानुसार दोन संशयित वाशी गाव बस थांब्यानजीक आढळून आले. त्यांच्या हालचाली संशयित व्यक्ती प्रमाणे असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कडे तब्बल १ किलो ४ ग्रॅम वजनाचा एम डी (  मेफेड्रोन ) हा अंमली पदार्थ आढळून आला. त्याचे बाजार मूल्य एकुण २ कोटी ८० हजार रुपये एवढे आहे. आरोपींच्या विरोधात गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारांवर परिणाम करणारे पदार्थ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयातील मुद्देमाल कोठुन आणला तसेच पाहिजे आरोपीचा शोध घेत घेतला जात आहे. गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सपोनि सचिन कोकरे, अंमली पदार्थ विरोधी कक्ष, गुन्हे शाखा, नवी मुंबई करीत आहेत.